भेंडाळा परिसरात जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचा संताप; आदेशाची जाहीर होळी
तालुका प्रतिनिधी

गडचिरोली, : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित JSW प्रकल्पासाठी शासनाने सुरू केलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात स्थानिक शेतकरी व नागरिक आक्रमक झाले आहेत. सुपीक व उत्पादनक्षम जमिनी अधिग्रहित केल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी 11 फेब्रुवारीच्या शासन निर्णयाची प्रत जाहीररित्या होळी करून निषेध व्यक्त केला.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, शेतकऱ्यांची संमती व ग्रामसभांचा विश्वास न घेता जमीन अधिग्रहण करणे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता सुपीक जमिनी कवडीमोल दराने घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शासनाने हा निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसह धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या आंदोलनात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.













