गडचिरोलीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; ACS मनीषा पाटणकर यांना निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी तीव्र

780

गडचिरोलीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; ACS मनीषा पाटणकर यांना निवेदन, निष्पक्ष चौकशीची मागणी तीव्र

गडचिरोली, दि. 20 एप्रिल 2026 — गडचिरोली जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यपद्धती व वर्तनाविषयी गंभीर तक्रारी समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (महिला आघाडी), जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेला प्राप्त तक्रारीनुसार, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी, कुरखेडा येथील डॉ. सुजिता वाडीवे यांनी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव, मानसिक छळ, विनयभंग, लैंगिक छळ, जातीवाचक अपमान तसेच खोटी माहिती व बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
डॉ. वाडीवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हिवताप नियंत्रणासाठी औषधे, कीटकनाशके व प्रयोगशाळा साहित्य खरेदी प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशिष्ट पुरवठादाराला लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच वारंवार फोन करून मानसिक छळ व धमक्या देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहितेचे उल्लंघन व पदाचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात डॉ. वाडीवे यांनी वरिष्ठांकडे अधिकृत तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या अपर मुख्य सचिव (गृह) सौ. मनीषा पाटणकर या गडचिरोली दौऱ्यावर आल्या असता, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (महिला आघाडी) यांच्या वतीने त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष सौ. मनीषा मडावी, भूषणा खेडेकर, राणी गोपशेट्टीवार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. निवेदनात या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
संघटनेच्या महिला आघाडीने चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याची मागणी केली असून, दोष सिद्ध झाल्यास कडक शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने मदत करावी, असेही निवेदनात नमूद आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास हा मुद्दा राज्य मानवाधिकार आयोग, राज्य महिला आयोग तसेच न्यायालयात नेण्यात येईल आणि जिल्हा परिषदेसमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

 

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले की, संबंधित महिला डॉक्टरांची तक्रार अंतर्गत तक्रार समिती (ICC) व पोलिस विभागाकडे पाठविण्यात आली असून निष्पक्ष चौकशी केली जाईल.

दुसरीकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “माझ्यावरचे आरोप निराधार असून मी चौकशीस पूर्ण सहकार्य करणार आहे,” असे स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हा तसेच राज्य स्तरावर लक्ष लागले असून, पुढील चौकशी आणि प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here