ग्रामपंचायतींवर लाल बावटा फडकवण्यासाठी सज्ज व्हा – शेकापचे भाई रामदास जराते यांचे आवाहन
गडचिरोली (शहर प्रतिनिधी):
ग्रामपंचायती या गावाच्या स्थानिक विकासाचे प्रमुख साधन असल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींवर स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकवण्याच्या उद्दिष्टाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनात्मक मजबुतीसाठी कामाला लागावे, असे आवाहन शेकापचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.
गडचिरोली येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांची संघटन बांधणी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले.
तालुक्यात कॉर्पोरेट कंपन्यांसाठी शासनाने एमआयडीसी जाहीर करताना शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित होऊ नयेत, यासाठी नव्या एमआयडीसी क्षेत्राला ग्रामपंचायत व ग्रामसभांनी विरोधाचे ठराव करावेत, असे आवाहन करण्यात आले. तसेच शेतजमिनींच्या सक्तीच्या भूसंपादनाला कारणीभूत ठरत असलेल्या लोह खाणींविरोधातील संघर्षात जनतेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय विधवा, निराधार व वृद्धांसाठीच्या पेन्शन योजनांमध्ये वाढ, अव्वाच्या सव्वा वीजबिल देणारे स्मार्ट मीटर रद्द करणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि नव्या पीककर्जाची तातडीने अंमलबजावणी, तसेच वेळेत व मुबलक प्रमाणात बी-बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली. या सर्व प्रश्नांवर तरुणांना मोठ्या संख्येने पक्षाशी जोडण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, अशोक किरंगे, चंद्रकांत भोयर, महागू पिपरे, उमाजी मुनघाटे, किसन साखरे, दादाजी कांबळे, राकेश भोयर, आशिष मेश्राम, शालिकराम भोयर, रुमाजी मेश्राम, दिपक मानकर, राजू जराते, प्रदीप मेश्राम, ताराचंद जेंगठे, आनंदराव मेश्राम, डोनूजी साखरे, रामदास दाणे आदी उपस्थित होते.













