जिथे उत्खनन तिथे उत्पादन” – शेतकऱ्यांची भूमिका; हेमंत जब्बेवार यांचा JSW ला इशारा

156

“जिथे उत्खनन तिथे उत्पादन” – शेतकऱ्यांची भूमिका; हेमंत जब्बेवार यांचा JSW ला इशारा

गडचिरोली : डोंगरगाव, येवली, शिवनी वाकडी परिसरातील शेतकरी मोठ्या उद्योगासाठी जमीन देण्यास तयार असल्याची माहिती शेतकरी नेते हेमंत जब्बेवार यांनी लोकसंवादातून दिली. या परिसरातील शेतकऱ्यांनी आपली जमीन JSW सारख्या मोठ्या उद्योगाला देण्याची तयारी दर्शवली असून, जमीन विक्री न करता ती महिनेवारी भाडे (लिज) पद्धतीने देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
हेमंत जब्बेवार यांनी सांगितले की, उद्योग सुरू असेपर्यंतच जमीन उद्योगाकडे राहील आणि उद्योग बंद झाल्यास ती जमीन मूळ शेतकऱ्यांना परत देण्यात यावी, अशी स्पष्ट अट शेतकऱ्यांनी ठेवली आहे.
ते म्हणाले की, सुरजागड परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात लोहखनिजाचे उत्खनन सुरू असून जवळपास ३५०० ट्रक दररोज गिट्टीच्या स्वरूपात खनिज बाहेर जिल्ह्यात व बाहेर राज्यात पाठवले जात आहेत. या वेगाने उत्खनन सुरू राहिल्यास पुढील ५० वर्षांत खनिज संपून जाईल आणि गडचिरोली जिल्हा भकास होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
“गडचिरोली हा निसर्गाने नटलेला जिल्हा आहे. स्वच्छ नद्या, हिरवेगार अरण्य आणि नैसर्गिक संपत्ती आहे. चुकीच्या धोरणांमुळे जर खनिज बाहेरच पाठवले गेले, तर भविष्यात स्थानिक लोकांपुढे आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही,” असेही जब्बेवार यांनी सांगितले.
त्यामुळे “जिथे उत्खनन तिथेच उत्पादन” या तत्त्वावर गडचिरोली जिल्ह्यातच उद्योग उभारावेत, अशी ठाम भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यासाठी शेतकरी दर एकरी मासिक भाडे करार आणि प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला नोकरी या अटींवर जमीन देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी हेमंत जब्बेवार यांनी प्रशासन व कंपन्यांना गंभीर इशारा देत सांगितले की,
“आता पुढील ३० दिवसांत योग्य निर्णय झाला नाही तर सुरजागडमधून निघणारा एकही ट्रक बाहेर जिल्ह्यात किंवा बाहेर राज्यात जाऊ दिला जाणार नाही.”
तसेच कोनसरी, सुरजागड आणि हेडरी प्रकल्पांमध्ये बाहेरील व्यक्तींना रोजगार दिला असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, स्थानिकांना प्राधान्य द्यावे अन्यथा बाहेरील कामगारांना हटवण्याची भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here