नवेगाव (गडचिरोली) येथे भर लोकवस्तीत प्रस्तावित प्लास्टिक कचरा प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध
ऊपसंपादक संतोषभारत
गडचिरोली,/चंद्रपूर दि. ४ मे २०२६
गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव (मुरखळा) येथे भर नागरी वस्तीत प्रस्तावित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वार्ड क्रमांक ३ मधील नागरिकांनी राज्याचे राज्यमंत्री व सह-पालक मंत्री मा. श्री. आशिषजी जयस्वाल यांना निवेदन सादर करून सदर प्रकल्पास तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, ग्रामपंचायत नवेगाव (मुरखळा) यांनी सर्वे क्रमांक ४८ येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०२२-२३ मध्ये घनकचरा डंपिंग यार्ड व कचरा विलगीकरण शेड उभारले होते. या डंपिंग यार्डमधून होणाऱ्या दुर्गंधी व प्रदूषणामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मागील सुमारे ८ महिन्यांपासून ते बंद ठेवण्यात आले आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, या ठिकाणी आधीच सुमारे १००० टन प्लास्टिक कचरा जमिनीत गाडण्यात आला असून त्यामुळे भूगर्भातील पाणी व पर्यावरण दूषित होत आहे. अशा परिस्थितीत त्याच ठिकाणी “संकल्प टेक्नोसॉफ्ट कॉर्पोरेशन” या खासगी कंपनीमार्फत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे, जी अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सदर प्रस्तावित प्रकल्प हा भर नागरी वस्तीत, तलावाच्या काठावर व सार्वजनिक पोलीस मैदानाच्या शेजारी असल्याने मोठ्या प्रमाणावर वायू, जल व ध्वनी प्रदूषण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्लास्टिक प्रक्रिया किंवा जाळण्यामुळे डायॉक्सिन व फ्युरानसारखे घातक वायू निर्माण होऊन कर्करोग, श्वसनाचे आजार व त्वचारोगांचा धोका वाढू शकतो, असेही नागरिकांनी नमूद केले आहे.
तसेच प्लास्टिकमधून निर्माण होणारे सूक्ष्म कण (मायक्रोप्लास्टिक) जमिनीत व पाण्यात मिसळून जमिनीची सुपीकता नष्ट करतात व पिण्याचे पाणी दूषित करतात. तलावाजवळ प्रकल्प उभारल्यास जलचरांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात नागरिकांनी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित विभागांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. तसेच स्थानिक नागरिकांची संमती न घेता प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा प्रकल्प पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ यांच्या तरतुदींना विरोधात आहे. संबंधित मार्गदर्शक सूचनांनुसार अशा प्रकल्पांना लोकवस्तीपासून किमान ५०० मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
प्रस्तावित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पास तात्काळ स्थगिती द्यावी.
सर्व पर्यावरणीय अहवाल व परवानग्या सार्वजनिक कराव्यात.
भविष्यातील कोणताही प्रकल्प लोकवस्तीपासून किमान ५०० मीटर अंतरावरच उभारावा.
सदर प्रकल्पास विद्यमान ठिकाणी मंजुरी देऊ नये.
निवेदन देताना मनिषा मडावी, राणी गोपशेट्टीवार, भुशणा खेडकर आदी नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी इशारा दिला आहे की, वेळेत योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.













