येनापूर–जयरामपूर मार्गावरील वाहतूक १० ते १४ मार्चदरम्यान तात्पुरती बंद
कार्यकारी संपादक रत्नमाला जि गेडाम/सुरपाम

गडचिरोली, दि. ९ : पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील मौजा कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचा लोह प्रकल्प सुरू असून या प्रकल्पासाठी मौजा मुधोली चक नं. २, पारडी देव (रिठ) व जयरामपूर येथील खाजगी तसेच शासकीय जमिनीचे मोजमाप व भूसंपादन प्रक्रिया ११ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे.
भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने किंवा निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून येनापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक १० मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार येनापूर–जयरामपूर मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक प्रतिबंधित राहणार आहे. मात्र प्रवासी बसेस तसेच पाणी पुरवठा, महावितरण, दूरसंचार आणि रस्ते दुरुस्ती संदर्भातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
सदर आदेश मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ व ११६ अन्वये जारी करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत.













