कोनसरीत १९ महिला एलएमईएल परिवारात दाखल
वर्षा भाजीपाले कार्यकारी संपादक
गडचिरोली/कोनसरी, प्रतिनिधी :
महिला सक्षमीकरण आणि कार्यबलातील लैंगिक समानतेचा नवा अध्याय लिहित लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने कोनसरी गावातील १९ महिलांचे समारंभपूर्वक स्वागत केले. हलकी मोटार वाहने चालविण्याचे एलएमईएल प्रायोजित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या महिलांना कंपनीत नोकरीची संधी मिळाली आहे.
जून महिन्यात एलएमईएलने या १९ महिलांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलँडच्या प्रशिक्षण केंद्रात ४५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी पाठवले होते. या काळात महिलांना वाहनचालकाचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि कुटुंबाचा अभिमान दोन्ही वृद्धिंगत झाला.
कोनसरी येथील लॉईड्स कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रात झालेल्या कार्यक्रमात एलएमईएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नव्याने सामील झालेल्या महिलांना संबोधित करताना सांगितले की, “समुदाय सक्षमीकरण हा एलएमईएलच्या यशाचा आधारस्तंभ आहे. व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक महिलांना कौशल्य विकासाद्वारे सक्षम करणे, कार्यबलात लैंगिक समानता प्रस्थापित करणे आणि प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे ही आमची भूमिका आहे.”
या प्रसंगी महिलांना नियुक्तीपत्रे, प्रशिक्षण प्रमाणपत्रे, वाहनचालक परवाने व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. महिलांना शिस्त, सुरक्षितता व जबाबदारीने काम करून उच्च पदांसाठी पात्र होण्याचा सल्लाही देण्यात आला.
एलएमईएल परिवारात या १९ महिलांच्या प्रवेशामुळे त्यांच्या जीवनप्रवासात प्रगतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे.













