आदिवासी लाभार्थी मेळावा व वसतीगृह इमारतींचे लोकार्पण
Tribal Development Minister Dr. Ashok uike
गडचिरोली दि.२९: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी व भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत लाभार्थी मेळावा व नवीन इमारतीचे आभासी पद्धतीने(व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) लोकार्पण तसेच भूमिपूजन सोहळा बुधवार, ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता येथील आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून वित्त व नियोजन ,कृषी, मदत व पुनर्वसन,विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, धर्मरावबाबा आत्राम, डॉ.मिलिंद नरोटे व रामदास मसराम तसेच आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, आदिवासी विकास विभागाच्या बांधकाम व्यवस्थापन कक्षाचे मुख्य अभियंता आबासाहेब नागरगोजे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत कार्यालयीन इमारत, शालेय इमारत व मुलींचे वसतीगृह, गडचिरोली प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा सोडे, रेगडी ,कारवाफा येथील मुला- मुलींचे वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा यासोबतच शासकीय आश्रम शाळा घाटी, येरमागड, भाडभिडी, अंगारा येथील मुला – मुलींचे वसतीगृह, अहेरी प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रम शाळा बाम्हणी, गुड्डीगुड्डम येथील मुला-मुलींचे वसतीगृह,भामरागड प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा कोठी, जांबीया येथील मुलांच्या वसतीगृह आदी बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे.
कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल(भामरागड) व सार्वजनिक बांधकाम (आदिवासी) विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन मुत्यालवार यांनी केले आहे.













