ई-पॉस प्रणालीतून खत विक्री अनिवार्य – कृषी विभागाच्या सूचना
गडचिरोली, दि. 29 जुलै (santosh bharat news network Gadchiroli): जिल्ह्यातील सर्व रसायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित खत विक्रीसाठी ई-पॉस (e-PoS) प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला असून, प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष गोडावूनमधील साठा यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाईच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.
अनुदानित खत विक्री ही केवळ ई-पॉस प्रणालीद्वारेच करण्याची सक्ती असून, विक्रीची नोंद iFMS प्रणालीमध्ये त्वरित आणि अचूक व्हावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना नियमित तपासणीसाठी निर्देश देण्यात आले आहेत.
ई-पॉस प्रणालीत दाखवलेला साठा आणि प्रत्यक्ष गोदामातील साठा यात कोणतीही तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अशा विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येऊन त्यांच्या परवाना नूतनीकरणास प्रतिबंध करण्यात येईल.
L1 सुरक्षा असलेल्या नवीन e-PoS मशीनबाबत अंतिम मुदत १० ऑगस्ट
जे विक्रेते अद्याप L1 सुरक्षा मानक असलेली ई-पॉस मशीन वापरत नाहीत, त्यांनी जिल्हा कृषी विकास अधिकारी, कार्यालयाशी संपर्क साधून १० ऑगस्ट २०२५ पूर्वी मशीनचे अद्ययावत करून घेण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.












