अगरबत्ती प्रकल्प प्रकरणाची CBI/ED/SIT चौकशीची करावी पत्रकार परिषद मध्ये नगरसेवक आशीष अरुण पिपरे
गडचिरोली : मेक इन गडचिरोली अंतर्गत राबविण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पासंदर्भातील सर्व प्रकरणाची CBI, ED किंवा स्वतंत्र SIT मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक आशीष अरुण पिपरे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संबंधित प्रकरणातील सर्व पुरावे आपण प्रशासनाकडे सादर केले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पिपरे यांनी आरोप केला की, काही राजकीय विरोधकांकडून सोशल मीडियावर त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव वापरून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली असून संबंधितांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच सर्वांवर दिवाणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अगरबत्ती उद्योगासाठी जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग व बँकांच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन व कर्जप्रस्तावाची प्रक्रिया करण्यात आली होती. मशीनच्या किंमतीत अनियमितता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बाजारभाव तपासून सुमारे ९० हजार रुपये दराने मशीन खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला. तीन वर्षे उत्पादन सुरळीत चालू होते; मात्र बँकेकडून कार्यभांडवल मंजूर न झाल्याने व कोविडनंतर आर्थिक अडचणी वाढल्याने प्रकल्प अडचणीत आल्याचे त्यांनी सांगितले.
काही विरोधक महिलांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या विरोधात वातावरण तयार करत असल्याचा आरोप करत पिपरे म्हणाले की, आगामी निवडणुका लक्षात घेऊन राजकीय कट रचला जात आहे. “कोणत्याही आरोपांना न घाबरता आम्ही जशास तसे उत्तर देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी व सत्य बाहेर यावे, यासाठीच केंद्रीय तपास यंत्रणांकडे चौकशी सोपवण्याची मागणी केल्याचे पिपरे यांनी सांगितले.













