LMGSE साठी प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक टप्पा
193 युवकांचा पहिला तुकडी रोजगारासाठी सज्ज
गडचिरोली दि २६ जानेवारी :- सामाजिक-आर्थिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) या उपक्रमाने 77व्या प्रजासत्ताक दिनी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. या दिवशी LMGSE च्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. एकूण 193 विद्यार्थ्यांनी 45 दिवसांचा सघन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून रोजगारासाठी सज्ज झाल्याने गडचिरोलीत उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
LMGSE ची स्थापना ही लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन यांच्या दीर्घकालीन दूरदृष्टीचे मूर्त रूप आहे. स्थानिक युवकांना सक्षम करून त्यांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच जिल्ह्यात उभ्या राहत असलेल्या औद्योगिक परिसंस्थेशी त्यांची कौशल्ये संलग्न करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलताना श्री प्रभाकरन यांनी पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत त्यांचे औपचारिकरित्या “लॉयड्स कुटुंबात” स्वागत केले. “गडचिरोलीला भारताचे दुसरे जमशेदपूर बनवण्याचे स्वप्न आहे,” असे नमूद करत त्यांनी सांगितले की LMGSE अंतर्गत मिळालेले प्रशिक्षण व प्रमाणपत्र युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विविध उद्योगांतील रोजगारासाठी महत्त्वाचे ठरेल.
यावेळी त्यांनी कंपनीच्या कर्मचारी समभाग मालकी योजना (ESOP) विषयी माहिती देत सांगितले की, या योजनेमुळे कर्मचारी कंपनीच्या प्रगतीचे थेट भागीदार बनतात. हे प्रशिक्षणार्थी केवळ नोकरीसाठी तयार नसून, योग्य कौशल्य, संधी आणि विश्वास यांच्या बळावर गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे भवितव्य कसे बदलता येते याचे ते प्रतीक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री अविश्यंत पांडा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी सांगितले की गडचिरोली वेगाने एक महत्त्वाचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असून, सुमारे ₹3 लाख कोटींची गुंतवणूक येथे होत आहे. यामुळे स्थानिक युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युवकांना कौशल्य प्रशिक्षण व शाश्वत रोजगार देणाऱ्या संस्थांशी जोडणे हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
LMGSE उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या कौशल्य विकास कार्याबद्दल श्री पांडा यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि श्री बी. प्रभाकरन यांचे विशेष कौतुक केले. पहिल्या तुकडीतील 193 प्रशिक्षणार्थींना यशस्वीपणे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
LMGSE कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात 11 डिसेंबर रोजी झाली असून, या पहिल्याच टप्प्यात उपक्रमाने गडचिरोलीतील युवकांसाठी परिवर्तन घडवून आणणारा प्रभावी घटक म्हणून स्वतःची ठोस ओळख निर्माण केली आहे.













