गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर सर्वांचे लक्ष; योगिता पिपरे पुन्हा चर्चेत

136

गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर सर्वांचे लक्ष; योगिता पिपरे पुन्हा चर्चेत

प्रतिनिधी – गडचिरोली

गडचिरोली दि ०५ नोव्हेबर:- नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच नगर विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या पिपरे दाम्पत्याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणाऱ्या योगिता पिपरे यांच्या दावेदारीला जनतेचा जोरदार पाठिंबा मिळताना दिसत आहे.

मागील पाच वर्षांत नगरपालिकेमार्फत झालेली भक्कम आणि प्रभावी विकासकामे ही मागील तीन दशकांच्या तुलनेत विशेष ठरल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या पाच शाळांचे नवीन बांधकाम, ५० ते ६० ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण, कारगिल चौकातील सैनिक स्मारकाचे बांधकाम, शंभर कोटींचे गटार लाईनचे काम, शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण, तसेच शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आखलेले धोरण — या सर्व कामांच्या मागे पिपरे दाम्पत्याचा पुढाकार आणि प्रयत्न असल्याचे सर्वत्र बोलले जाते.

भाजपने आतापर्यंत आपल्या एकनिष्ठ आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून यश मिळवले आहे. मात्र, काँग्रेस पक्षाकडून शरद पवार राष्ट्रवादी पक्षातून आलेल्या धनाढ्य महिला नेत्याला उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होताच शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकद शहरात वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

अशा परिस्थितीत भाजपकडून योगिता पिपरे यांची दावेदारी नाकारल्यास सत्ता गमवावी लागू शकते, अशी चर्चा शहरभर रंगली आहे.
राजकारणातील प्रावीण्य, अनुभव आणि लोकसंपर्काचा त्रिवेणी संगम असलेल्या योगिता पिपरे या आज शहरातील महिलांच्या नेतृत्वाचे प्रतीक म्हणून उभ्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहराचा विकास अधिक गतीमान होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे की, राजकारणात नवख्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय भाजपला महागात पडू शकतो. नगरपालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करायची असल्यास, एकनिष्ठ आणि विकासाभिमुख कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणे पक्षाच्या हिताचे ठरेल, असा सर्वसामान्यांचा एकमुखी स्वर आहे.

एकंदरीतच, भाजपने योग्य, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवल्यास, गडचिरोलीत पुन्हा एकदा भगवा फडकण्यास कुणीही अडथळा आणू शकणार नाही, हे निश्चित!पन निर्णय मात्र गुलदस्त्यात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here