गडचिरोलीत खळबळजनक घटना — भाजप नेते यांच्या निवासस्थानावर पोलिसांचा छापा; ४५ पेट्या देशी दारू जप्त

163

गडचिरोलीत खळबळजनक घटना — भाजप नेते मधुकर भांडेकर यांच्या निवासस्थानावर पोलिसांचा छापा; ४५ पेट्या देशी दारू जप्त

गडचिरोली :दि १२आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात एक मोठी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात भाजपचे नेते तसेच भाजप युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता मधुकर भांडेकर यांच्या वालसरा (ता. चामोर्शी) येथील निवासस्थानी पोलिसांनी मंगळवारी पहाटे टाकलेल्या छाप्यात तब्बल ४५ पेट्या देशी दारूचा साठा जप्त केला आहे.

दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, चामोर्शी पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार या प्रकरणी भाजप युवा आघाडीचे चामोर्शी तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर (मधुकर भांडेकर यांचे लहान बंधू) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेनंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमांवरही ही बातमी जोरदार चर्चेत असून, “दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचेच नेते असे गैरकृत्य करत आहेत, हे जनतेची दिशाभूल करणारे आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या प्रमाणात दारूचा साठा आढळल्याने तो मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणार होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही माजी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात शासकीय निवासस्थानातील वस्तू गायब केल्याचा आरोप झाला होता, हे विशेष.

या संदर्भात मधुकर भांडेकर यांना मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही घटना आमच्याविरोधात रचलेले राजकीय षड्यंत्र आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्हाला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. जिथे दारू सापडली ते माझ्या चुलत्याचे घर आहे; मी तेथे राहत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here