नवरात्रीत गडचिरोलीत मटण मार्केट बंद – हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश

95

नवरात्रीत गडचिरोलीत मटण मार्केट बंद – हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश

वर्षा भाजीपाले कार्यकारी संपादक

गडचिरोली शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्री मोठ्या श्रद्धा व उत्साहात सुरू झाली आहे. या पावन उत्सवात धार्मिकतेसोबतच सामाजिक ऐक्य वृद्धिंगत व्हावे, यासाठी शहरातील सर्व मटण व चिकन मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या उपक्रमाचे नेतृत्व कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केले असून, शहरातील मांस विक्रेत्यांनी—विशेषतः मुस्लिम बांधवांनी—या निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत मांस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आश्वासन देत त्यांनी हिंदू बांधवांसोबत सामाजिक बंधुभावाचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे.

या निर्णयाबाबत बोलताना उदय धकाते म्हणाले,“नवरात्री हा शुद्धतेचा आणि मातृशक्तीची उपासना करण्याचा उत्सव आहे. या काळात मांस विक्री बंद ठेवणे म्हणजे केवळ धार्मिक परंपरा पाळणे नव्हे, तर समाजात ऐक्य, सौहार्द व परस्पर आदराचे मूल्य जपणे आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांनी दिलेले सहकार्य हे गडचिरोलीच्या सौहार्दपूर्ण संस्कृतीचे खरे दर्शन आहे.”दरम्यान, कारगिल चौकात दुर्गा देवींची स्थापना करून विधिवत पूजा-अर्चा सुरू आहे. महिला मंडळांच्या वतीने पारंपरिक गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.शहरातील कोणत्याही भागात मांस विक्री सुरू असल्यास स्थानिक दुर्गा व शारदा मंडळांनी दुकाने बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गडचिरोलीकरांच्या या उपक्रमाने नवरात्रीला धार्मिकतेसोबतच सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here