हालूरच्या महिलांचा पुढाकार : गावात दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव

107

हालूरच्या महिलांचा पुढाकार : गावात दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव

 

वर्षा सुरपाम कार्यकारी संपादक

गडचिरोली (ता. एटापल्ली) :

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हालूर गावातील ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव एकमुखाने मंजूर केला असून, या निर्णयात विशेषतः गावातील महिलांचा पुढाकार लक्षणीय ठरला आहे.

व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) च्या प्रेरणेने व पाठिंब्याने गावातील महिलांनी दारू सेवनामुळे उद्भवणाऱ्या कौटुंबिक वाद, आरोग्य समस्या, आर्थिक अडचणी व अपघात यांसारख्या संकटांविरुद्ध ठाम भूमिका घेतली. महिलांच्या या पुढाकाराला गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत गावात दारूबंदीचा ठराव पारित केला.

गावातील सरपंच अरुणाताई मधुकर सडमेक, पाटील लच्चू हेडाऊ, भूमिया धनसू होडे, महिला मंडळ अध्यक्षा कलावती तिरकी, उपाध्यक्षा फुलसिना एक्का, सचिव बाली हेडो यांच्यासह गावातील अनेक महिला व ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. ग्राम संपर्क केंद्राचे कर्मचारी किशोर गावडे यांनी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ग्रामस्थांच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे गावातील समग्र विकासाला चालना मिळेल, आरोग्य सुधारेल व सामाजिक सौहार्द वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दारूमुक्त गावाचा संकल्प हाच चांगल्या आणि निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरेल, असे मत एलआयएफच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here