बोगस मजुरांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश; दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची डॉ. प्रणय खुणे यांची मागणी

102

बोगस मजुरांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश; दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची डॉ. प्रणय खुणे यांची मागणी

गडचिरोली, ता. २७ : आलापल्ली वनविभागातील आलापल्ली व पेरमिली वनपरिक्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांची नावे दाखवून, खोट्या स्वाक्षऱ्या वापरून व बनावट व्हाऊचर बिल तयार करून शासनाच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. खुणे म्हणाले की, या गैरव्यवहारात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमत असून, त्यांनी एकत्र येऊन शासनाचा निधी लाटला आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यांनीही केवळ थातूरमातूर चौकशी करून शासनाची व तक्रारकर्त्यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे शासनाने सर्व संबंधितांवर निलंबनाची कारवाई करून अफरातफर झालेल्या रकमेची वसुली करावी, असेही डॉ. खुणे यांनी ठामपणे नमूद केले.

आलापल्ली वनविभागातील सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीत जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण आदिवासी उपयोजना, राज्य योजना, मॅप अभिसरण या अंतर्गत केलेल्या कामांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले. संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची प्रत्यक्ष चौकशी तक्रारकर्त्यांच्या उपस्थितीत व्हावी आणि चौकशीचे व्हिडिओ चित्रीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

या पत्रकार परिषदेला शंकर ढोलगे, मनिषा मडावी, कृष्णा वाघाडे, रवी सेलोटे, विलास भानारकर, योगेश सिडाम, राहुल वासनिक, प्रवीण ठाकरे, आदर्श धुरके, दिलीप मेवगंटीवार, विजय मज्जी आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here