गडचिरोलीत स्वच्छतेसाठी मोठे पाऊल : ८० लाखांच्या स्वयंचलित स्वीपिंग मशीनचे लोकार्पण
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. १२ फेब्रुवारी २०२६ — शहराच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने आणि ‘लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’च्या CSR निधीतून सुमारे ८० लाख रुपये किमतीच्या अत्याधुनिक स्वयंचलित रस्ते सफाई यंत्राचे लोकार्पण आज माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उत्साहात करण्यात आले. मात्र या महत्त्वाच्या कार्यक्रमास नगराध्यक्ष व नगरपालिका उपाध्यक्ष अनुपस्थित असल्याची बाब विशेष चर्चेचा विषय ठरली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. अशोकजी नेते यांनी भूषविले, तर उद्घाटन आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी नवनियुक्त नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळाही पार पडला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. नेते यांनी सांगितले की, गडचिरोली शहराला “स्मार्ट आणि स्वच्छ” बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. या स्वयंचलित मशिनमुळे रस्ते सफाई अधिक वेगाने व प्रभावीपणे होईल आणि नागरिकांना धूळमुक्त व आरोग्यदायी वातावरण मिळेल. कॉर्पोरेट क्षेत्राच्या CSR उपक्रमातून मिळालेला हा सहभाग शहराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच राज्याच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असल्याचे सांगून त्यांनी आभार व्यक्त केले आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जनसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, लॉईड्स मेटल्सचे नटराजन एम., माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, महिला मो.प्र. सचिव रेखाताई डोळस, आरोग्य व स्वच्छता सभापती मुक्तेश्वर काटवे, गटनेते तथा बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका योगिता पिपरे, वर्षा शेडमाके, नगरसेवक रमेश चौधरी, सतीश विधाते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, अनिल पोहनकर, सुधाकर येंगदलवार, अविनाश महाजन, अविनाश विश्रोजवार, दिपक सातपुते, लक्ष्मी कलंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
चामोर्शी मार्गावरील कर्तव्य कक्ष क्र. १ येथे झालेल्या या सोहळ्यात शहर स्वच्छतेचा नवा संकल्प करण्यात आला. या आधुनिक मशिनमुळे मुख्य मार्गांची सफाई कमी वेळात पूर्ण होणार असून मानवी श्रमाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच धूळ नियंत्रण, कचरा संकलन आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही या यंत्राचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन चेतन गोरे यांनी केले, तर नगर परिषदेच्या वतीने आभार प्रदर्शन करण्यात आले. नागरिक, विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.













