स्टील प्रकल्पाविरोधात संताप उसळला ग्रामसभा उधळली; जमीन खरेदीच्या हालचालींवर ग्रामस्थांचा रोष

88

स्टील प्रकल्पाविरोधात संताप उसळला
ग्रामसभा उधळली; जमीन खरेदीच्या हालचालींवर ग्रामस्थांचा रोष

 

गडचिरोली, ता. १० — जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात अडपल्ली ग्रामपंचायत क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीच्या पोलाद प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतली असून, सोमवारी (दि. ९) बोलावण्यात आलेली विशेष ग्रामसभा संतप्त ग्रामस्थांनी उधळून लावली. अचानक नोटीस देऊन ग्रामसभा बोलावल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दुपारी ३ वाजता आयोजित सभेसाठी अडपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत विविध गावांमधून शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मात्र, ग्रामस्थांना विश्वासात न घेता कंपनीला जमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी सभेचा बहिष्कार जाहीर केला आणि सभा तहकूब करण्याची मागणी केली. गोंधळाच्या वातावरणात संतप्त ग्रामस्थांनी सरपंच, कंपनीचे प्रतिनिधी आणि मध्यस्थांवर हल्ला केल्याची घटना घडल्याने परिस्थिती अधिक चिघळली.
ग्रामस्थांच्या मते, ८ फेब्रुवारीच्या सायंकाळी अचानक नोटीस चिकटवून दुसऱ्याच दिवशी सभा बोलावण्यात आली होती. “ग्रामस्थांना विश्वासात न घेता कंपनीला जमीन देण्याचा अधिकार कुणाला आहे?” असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. विशेष म्हणजे, ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या मागील ग्रामसभेत स्टील प्रकल्पाला स्पष्ट विरोध करून जमीन न देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. तरीही पुन्हा नव्याने सभा बोलावण्यात आल्याने नागरिकांमध्ये संशय आणि नाराजी वाढली.
दरम्यान, सुरजागड टेकडीवर लोहखनिज उत्खनन सुरू झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात विविध कंपन्यांकडून पोलाद प्रकल्प उभारणीच्या हालचाली वाढल्या आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक नव्याने स्थापन झालेल्या कंपन्या गेल्या सहा-सात महिन्यांपासून केवळ जमिनी खरेदी करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे “प्रकल्पाच्या नावाखाली जमिनींचे एकत्रीकरण करून त्या भविष्यात मोठ्या उद्योगसमूहांना विकण्याचा डाव असू शकतो,” असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सभेतील वातावरण तापल्याचे पाहून आष्टी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. अखेर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे सभा तहकूब करण्यात आली. “आम्ही आमच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत विकणार नाही. कितीही आमिषे दाखवली तरी गाव आपल्या भूमिकेवर ठाम आहे,” असा इशारा ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित ग्रामस्थांनी दिला. मध्यस्थांमार्फत व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना धडा शिकवू, असा इशाराही देण्यात आला.
या घटनानंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच, जिल्ह्यात वाढत्या जमीन खरेदी व्यवहारांवर प्रशासनाने लक्ष ठेवावे, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here