गडचिरोली शहरात महिला व बाल भिक्षावृत्ती वाढली; कारवाईची मागणी
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली दि ०२ जानेवारी :- शहरात अलीकडच्या काळात महिला आणि लहान मुलांसह भिक्षावृत्तीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील चौक, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि वाहतूक सिग्नल परिसरात महिलांनी मुलांना घेऊन भिक्षा मागण्याच्या घटना सातत्याने दिसत आहेत. यामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बाबीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते सागर निंबोरकर यांनी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
रस्त्यावर तासन्तास भिक्षा मागणे, उन्हात व धुळीत राहणे, योग्य आहार व आरोग्यसेवा न मिळणे यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेक मुले शिक्षणापासून दूर राहत असून, त्यांचे शोषण होण्याची शक्यता वाढली आहे. बालकांना भिक्षावृत्तीत ढकलणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे निंबोरकर यांनी सांगितले.
निंबोरकर यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत—
शहरातील महिला व बाल भिक्षेकर्यांची नोंदणी करून त्यांची योग्य तपासणी करावी. बालकल्याण समितीमार्फत मुलांना संरक्षणात घ्यावे व त्यांना शिक्षण, पोषण आणि आरोग्य सुविधा द्याव्यात. महिलांसाठी आश्रय, रोजगार व पुनर्वसनाची व्यवस्था करावी. नगरपरिषद, पोलीस व संबंधित विभागांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवावी. तसेच नागरिकांमध्ये ‘भिक्षा नको, मदत द्या’ याबाबत जनजागृती करावी.
याबाबत बोलताना सागर निंबोरकर म्हणाले,
“भिक्षावृत्ती थांबवणे म्हणजे मुलांचे भविष्य सुरक्षित करणे आणि महिलांना सन्मानाने जगण्याची संधी देणे होय. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी.”
गडचिरोली शहर भिक्षावृत्तीमुक्त व सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.













