प्रेरणादायी मार्गदर्शनात विद्या भारती हायस्कूल, गोगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणविकासाला स्नेहसंमेलनातून नवी दिशा
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली दि १ जानेनारी :- दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था संचालित विद्या भारती हायस्कूल, गोगाव येथे दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती प्रतिभा रामटेके (मुख्याध्यापिका) होत्या. उद्घाटक म्हणून डॉ. सुरेश रामभाऊ रडके (सदस्य, दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था तथा अध्यक्ष शा.स.वि.हा. गोगाव) उपस्थित होते. श्रीमती संगीता खोब्रागडे (शिक्षण विस्तार अधिकारी) यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका श्रीमती योगिता पिपरे (नगर परिषद, गडचिरोली), प्रशांत खोब्रागडे (सरपंच, महादवाळी), मुखरू पा. चुधरी, पेवानंद पा. चुधरी तसेच उत्तम मूनघाटे (पोलीस पाटील) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेत आकर्षक रचना साकारल्या. सुंदर रांगोळ्यांसाठी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
स्नेहसंमेलनात पाककला, पुष्परचना, हस्तकला, प्रश्नमंजुषा, गीतगायन, तसेच विज्ञान व गणितीय प्रतिकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविल्याने शाळेच्या उपक्रमशीलतेचे दर्शन घडले.
नगरसेविका योगिता पिपरे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
प्रमुख अतिथी नगरसेविका योगिता पिपरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. स्पर्धांमुळे आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकास कसा घडतो, यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. “ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत; योग्य संधी व मार्गदर्शन मिळाले तर ते उज्ज्वल यश मिळवू शकतात,” असे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच ‘हर घर तिरंगा’ व ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित नगरसेविका योगिता पिपरे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान केला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि आत्मविश्वासाला नवी दिशा मिळाली.













