AWS ची ८.४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक : महाराष्ट्राचे डिजिटल सामर्थ्य वाढविणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात

114

AWS ची ८.४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक : महाराष्ट्राचे डिजिटल सामर्थ्य वाढविणाऱ्या नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई,प्रतिनिधी दि. 25 सप्टेंबर –

जागतिक पातळीवरील क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी Amazon Web Services (AWS) ने महाराष्ट्रात पहिल्या डेटा सेंटरच्या पायाभरणीला सुरुवात केली असून, यामुळे राज्याच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ही पायाभरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दूरस्थ पद्धतीने पार पडली. या सोहळ्यास AWS चे व्हाईस प्रेसिडेंट (ग्लोबल पब्लिक पॉलिसी) मायकेल पंके, AWS इंडिया चे सीईओ संदीप दत्ता आणि वरिष्ठ व्यवस्थापन टीम उपस्थित होती.

अब्जावधींचा विश्वास

AWS ने महाराष्ट्रात यापूर्वीच ३.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून कार्यरत डेटा सेंटर्स उभारले आहेत. त्याशिवाय आता कंपनीने ८.४ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹७० हजार कोटी) इतक्या प्रचंड नव्या गुंतवणुकीची वचनबद्धता केली आहे. ही गुंतवणूक पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने होणार असून, तिचा करार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाच्या जानेवारीत WEF, Davos येथे स्वाक्षरी करून निश्चित केला होता.

केवळ डेटा सेंटर नव्हे, सर्वसमावेशक भागीदारी

ही गुंतवणूक केवळ डेटा सेंटरच्या स्थापनेपुरती मर्यादित नाही. बैठकीत कौशल्य विकास, डिजिटल परिवर्तनातील भागीदारी आणि CSR उपक्रमांवर विस्तृत चर्चा झाली. विशेषत: STEM शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा, तसेच स्टार्टअप्स व MSMEs साठी क्लाउड सपोर्ट या क्षेत्रांना AWS ने अग्रक्रम दिला आहे.

STEM शिक्षण उपक्रमाचा शुभारंभ

आजच्या सोहळ्यात ‘अॅडव्हान्स्ड STEM एज्युकेशन व्हॅन’ ला देखील हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही व्हॅन राज्यभरातील शासकीय शाळांमध्ये जाऊन ४ हजार विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “AWS च्या या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राचे तंत्रज्ञान क्षेत्र नवी उंची गाठेल. STEM शिक्षणाबाबत त्यांचा कटाक्ष आणि डिजिटल परिवर्तनातला सक्रीय सहभाग प्रेरणादायी आहे. ही भागीदारी केवळ राज्याच्या अर्थव्यवस्थेलाच नाही, तर लाखो युवक-युवतींच्या करिअरला नवी दिशा देणारी ठरेल.”

महाराष्ट्रासाठी भविष्यदर्शी पाऊल

AWS च्या या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर डिजिटल हब म्हणून स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कौशल्य विकास, नवउद्योगांना प्रोत्साहन आणि डिजिटल समावेशकतेच्या दिशेने उचललेले हे पाऊल राज्यासाठी भविष्यदर्शी ठरणार आहे, याबाबत उपस्थितांमध्ये एकमत होते.

ठळक मुद्दे

महाराष्ट्रात AWS च्या पहिल्या डेटा सेंटरची पायाभरणी

८.४ अब्ज डॉलर्स (₹७० हजार कोटी) इतकी नवी गुंतवणूक

याआधीच ३.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक कार्यरत

पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक पूर्ण

STEM शिक्षण, नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स व MSMEs ला AWS चे पाठबळ

‘अँडव्हान्स STEM एज्युकेशन व्हॅन’ शाळांमध्ये फिरून ४ हजार विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये शिकवणार

मुख्यमंत्री फडणवीस : “AWS ची भागीदारी युवक-युवतींच्या करिअरला नवी दिशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here