अमृत’ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरे

186

अमृत’ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरे

Free skill development training camps through ‘Amrut’ and Maharashtra Entrepreneurship Development Centre

गडचिरोली दि.३१: महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ‘अमृत’ लक्षित गटातील युवक-युवतींसाठी विविध निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी, श्री. के. पी. टाकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अमृत’ लक्षित गटातील उमेदवारांसाठी चार प्रकारचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, ज्यांचा कालावधी १८ दिवसांचा असेल:

अमृत सूर्यमित्र (सौर): सौर ऊर्जा क्षेत्रातील कौशल्यांवर आधारित.

अमृत-बेकरी: बेकरी उत्पादनांच्या निर्मिती आणि व्यवस्थापनावर केंद्रित.

अमृत-आयात निर्यात: आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यात प्रक्रियेचे ज्ञान.

अमृत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण (REDP): उद्योजकतेच्या सर्व पैलूंवर व्यापक मार्गदर्शन.

याशिवाय, तीन प्रकारचे अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम देखील उपलब्ध असतील:

अमृत-उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम: २१ दिवसांचा कालावधी.

अमृत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम: ३० दिवसांचा कालावधी, संबंधित व्यवसायाच्या तांत्रिक प्रात्यक्षिकांवर विशेष भर.

अमृत क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम: ०६ दिवसांचा कालावधी.

या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तांत्रिक बाबींवरील प्रात्यक्षिकांसोबतच उद्योजकीय मार्गदर्शन, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक, व्यवस्थापकीय आणि कायदेशीर माहिती, प्रभावी मार्केटिंग कौशल्ये, ग्राहकांशी संबंध निर्माण करून बाजारात व्यवसाय वाढवण्याचे तंत्र, शासनाच्या विविध योजना, बँकिंग प्रक्रिया, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे, उद्योजकीय मानसिकता आणि गुणसंपदा यांसारख्या विविध विषयांवर तज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, व्यवसाय उभारणीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे पाठपुरावा केला जाईल आणि प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करेपर्यंत मोफत मार्गदर्शन उपलब्ध असेल, असेही श्री. टाकळे यांनी नमूद केले.

 

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया:

‘अमृत’ लक्षित गटातील किमान ८ वी पास असलेले आणि कोणत्याही शासकीय कागदपत्रांवर जातीचा उल्लेख तसेच तहसीलदार यांचा रहिवाशी आणि उत्पन्न दाखला असलेले सर्व इच्छुक युवक-युवती या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. MCED द्वारे जिल्हा उद्योग केंद्र, कॉम्प्लेक्स एरिया, MIDC रोड, गडचिरोली येथे सध्या निवड प्रक्रिया सुरू आहे. पात्र लाभार्थींची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

इच्छुक उमेदवारांनी ५ ऑगस्ट २०२५ पर्यंत खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

श्री. के. पी. टाकळे (प्रकल्प अधिकारी, MCED गडचिरोली): मो. ९१६८६६७१८१

श्री. विक्रांत पांडे (अमृत जिल्हा व्यवस्थापक, गडचिरोली): मो. ९८३४३२३७२७

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. निलेश गायकवाड आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर विभागाचे विभागीय अधिकारी श्री. हेमंत वाघमारे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवती, उद्योजक आणि नवउद्योजकांनी या निःशुल्क प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here