गट ग्रामपंचायत पळसगावचे विभाजन करून पाथरगोटा ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्थापना – आमदार रामदास मसराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
आरमोरी |(गडचिरोली)आरमोरी मतदारसंघातील नागरिकांची अनेक वर्षांची अपेक्षा अखेर पूर्ण झाली आहे. गट ग्रामपंचायत पळसगावचे विभाजन करून महसुली गाव पाथरगोटा याची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी *आमदार रामदास मसराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. याआधी ज्या लोकप्रतिनिधींना जमलं नाही ते नवखे असलेले आमदार रामदास मसराम यांनी करून दाखवलं असे स्पष्ट मत पाथरगोटा वासिया व्यक्त करत आहेत
पाथरगोटा गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण कामकाजात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. गट ग्रामपंचायतीखाली येत असल्याने विकासकामांचा वेग कमी होता, निधीचे योग्य नियोजन होत नव्हते आणि नागरिकांना प्रशासकीय निर्णयांसाठी इतर गावांवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासात अडथळे निर्माण होत होते.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत आमदार रामदास मसराम यांनी संबंधित प्रशासन व ग्रामविकास विभागाशी चर्चा केली. त्यांनी राज्य शासनाला सविस्तर निवेदन सादर करून पाथरगोटा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
आमदार मसराम यांनी बैठका, पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे शासनाला या निर्णयाचे महत्त्व पटवून दिले. अखेर शासनाने ही मागणी मान्य करून पाथरगोटा गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा आदेश जारी केला.
स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्यामुळे आता पाथरगोटा गावाला स्वतःचा प्रशासकीय अधिकार मिळणार असून, गावाच्या विकासासाठी येणारा निधी थेट ग्रामस्थांच्या गरजेनुसार वापरला जाईल. पाणीपुरवठा, रस्ते, नाली, वीज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा अधिक सुलभ होतील आणि विकासकामांना गती मिळेल.या निर्णयामुळे पाथरगोटा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी आमदार रामदास मसराम यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “हा निर्णय गावाच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. ग्रामपंचायत स्वायत्त झाल्याने प्रत्येक नागरिकाचा सहभाग वाढेल आणि खऱ्या अर्थाने ग्रामस्वराज्य साकारेल,” असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.आमदार रामदास मसराम यांनी सांगितले की, “स्थानिक विकासासाठी जे काही आवश्यक आहे त्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेत राहीन. पाथरगोटा ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्थापना ही गावाच्या विकासाची नवी सुरुवात ठरेल.













