आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करू आदिवासी लाभार्थी मेळाव्यात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

64

आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करू आदिवासी लाभार्थी मेळाव्यात मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची ग्वाही

गडचिरोली दि. २२ : आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिली.

आदिवासी विकास विभागातर्फे येथील शासकीय इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळेत आयोजित आदिवासी लाभार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करतांना डॉ. गावित बोलत होते. आमदार डॉ. देवराव होळी, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दशरथ कुळमेथे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त जितेंद्र चौधरी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरड्डीवार व सुधाकर गौरकर तसेच सर्वश्री उत्तम इंगळे, प्रशांत वाघरे, नितीन मडावी, सदानंद गाथे, अक्षय उईके यावेळी मंचावर उपस्थित होते.

डॉ. गावित यांनी पुढे सांगितले कि, गडचिरोली जिल्ह्यात रेशीमकोष, तेंदूपत्ता, लाख, मोहफुले यासारखे वनउपज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या कच्च्या वनउपजपासून प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य व प्रशिक्षण आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येईल. येथील दुर्गम भागांना बारमाही रस्त्यांना जोडून रस्ते, वीज, पाणी व शिक्षण या मूलभूत गरजा उपलब्ध करण्याकडे शासन प्राधान्याने प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक घरात विद्युतजोडणी व नळाचे पाणी उपलब्ध करून घेण्यासाठी शासकिय योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी आश्रम शाळेत अधिक सुधारणा करण्यात येणार असल्याचे सांगतांना आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‍त्यांची परीक्षा त्रयस्थ संस्थांकडून घेण्याचे व शिक्षकांनाही नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्योच ते म्हणाले. स्पर्धा परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी पुणे नाशिक आदी मोठ्या शहरात आठवीपासूनच्या किमान 500 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्याची सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आदिवासी खेळाडूंचा टक्का वाढावा म्हणून खेळासाठी समर्पित विशेष स्पोर्ट्स आश्रम शाळा सुरू करणार असल्याची माहिती डॉ. गावित यांनी दिली.

आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजाने आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा प्रकल्प कार्यालयाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याच्या लाभाचे ऑनलाईन वितरण करण्यात आले तर न्युक्लीअर बजेट योजनेंतर्गत काटेरी तार कुंपणासाठी ४० लाभार्थी, विविध व्यवसायाकरिात अर्थसहाय्य योजनेसाठी ३० लाभार्थी, शिवणयंत्र वाटप ५० लाभार्थीं यांना ८५ टक्के अनुदानाचा लाभ देण्यात आला. तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळांतर्गत १० लाभार्थ्यांना कर्ज मंजूरीचे प्रमाणपत्र व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत सिंचन विहिरी साठी अनुदान लाभाचे धनादेश वितरीत करण्यात आले.

सुरूवातीला एकलव्य निवासी शाळा चार्मोशी येथील विद्यार्थींनींनी पारंपारिक आदिवासी वेषभूषेत नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे संचालन संतोष कन्नाके यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, वासुदेव उसेंडी ,दादाजी सोनकर, मुकेश गेडाम, सुधीर शेंडे, प्रकाश अक्यमवार , ओम राठोड, पुजा कोडापे ,शुभांगी कोहळे, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा व प्रकल्प कार्यातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here