समाज कल्याणच्या निवासी शाळांना प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

38

समाज कल्याणच्या निवासी शाळांना प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्याच दिवशी सर्व जागा भरल्या; २१० जागांसाठी ४९८ अर्ज

गडचिरोली : समाज कल्याण विभागाच्या गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सर्व जागा पूर्ण भरल्या आहेत.

जिल्ह्यात नवेगाव व वांगेपल्ली (अहेरी) येथे मुलांसाठी तर सिरोंचा येथे मुलींसाठी समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते १० वीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून, प्रत्येक वर्गासाठी ४० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. दिनांक १५ मे रोजी प्रवेशासाठी यादी जाहीर करण्यात आली होती.

राज्यात अनेक ठिकाणी शासकीय शाळांमधील पटसंख्या घटत असताना गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांना “हाऊसफुल्ल” प्रतिसाद मिळणे ही आनंददायी बाब आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच निवास, भोजन, क्रीडा साहित्य, संगणक सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, डिजिटल शिक्षण आदी सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे पालकांचा या शाळांकडे ओढा वाढत आहे.

यावर्षी तिन्ही शाळांमध्ये एकूण २१० जागांसाठी तब्बल ४९८ अर्ज प्राप्त झाले होते. पालकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच विविध क्रीडा प्रकारांमध्ये ९८ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात समाज कल्याण विभागाच्या या शाळा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद हीच या कार्याची पावती असल्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, गडचिरोली डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here