लॉयड्सकडून गडचिरोलीत कौशल्य विकासाला चालना; LMGSE उपक्रमाचा दुसरा बॅच यशस्वी
जिला प्रतिनिधी
गडचिरोली दि २६ मार्च २०२६ :- जिल्ह्यातील युवकांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) या उपक्रमाने आणखी एक महत्त्वाची पायरी गाठली आहे. आज या उपक्रमाच्या दुसऱ्या प्रशिक्षण बॅचचे यशस्वी समारोप करण्यात आला. 28 जानेवारी 2026 रोजी सुरू झालेला हा बॅच 26 मार्च रोजी पूर्ण झाला असून तब्बल 255 प्रशिक्षणार्थींना कौशल्य प्रशिक्षणासह तत्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
समारोप कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन, रेसिडेंट डायरेक्टर श्री हिम्मत सिंह, एक्झिक्युटिव डायरेक्टर श्री एस. वेंकटेश्वरन यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कौशल्य दरी भरण्याचा प्रयत्न
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या LMGSE उपक्रमामुळे जिल्ह्यात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. स्थानिकांना शाश्वत उपजीविका उपलब्ध व्हावी, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स-ड्रायव्हिंग आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता केंद्रे (CoEs) उभारण्यात आली आहेत. यात वेल्डिंग, इलेक्ट्रिकल, वेअरहाऊस ऑपरेशन्स, ड्रायव्हिंग, फूड अँड बेव्हरेज सेवा, हाऊसकीपिंग, रिटेल आदी प्रशिक्षणांचा समावेश आहे.
11 डिसेंबर 2025 रोजी सॉफ्ट लॉन्च झाल्यापासून या उपक्रमाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. पहिल्या बॅचमधील 527 उमेदवारांना 100% प्लेसमेंट मिळाले होते. प्रशिक्षण पूर्ण होताच अप्रेंटिसशिप नियुक्तीपत्र देऊन “शिक्षण ते रोजगार” या प्रवासाला गती दिली जात आहे.
“गडचिरोलीच्या विकासाचा पाया म्हणजे स्थानिकांचा सक्षमीकरण”
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी LMGSE चा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी LMGSE च्या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले,
“ही संस्था गडचिरोलीच्या समृद्ध भविष्यासाठी पायाभरणी करत आहे. आतापर्यंत लॉयड्सने 2000 हून अधिक कुशल कामगार घडवले आहेत. आमचे उद्दिष्ट केवळ शिक्षित नव्हे, तर सक्षम, अत्यंत कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे आहे.”
ते पुढे म्हणाले,
“गडचिरोलीचा विकास म्हणजे तेथील लोकांचे सक्षमीकरण. आम्ही येथे ‘नवीन जमशेदपूर’ उभारण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करत आहोत.”
महिलांसाठी अत्याधुनिक ड्रायव्हिंग स्कूल
प्रभाकरन यांनी कार्यक्रमात महिलांसाठी विशेष प्रगत ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याची घोषणा केली. विविध प्रकारची वाहने चालवण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबरच महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांसह विशेष सुविधायुक्त वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे गडचिरोलीला स्टील हब बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजीत केलेल्या संवादाचे विशेष कौतुक करण्यात आले, जे या उपक्रमातून होत असलेल्या सर्वांगीण विकासाचे द्योतक आहे.
LMGSE उपक्रमाच्या माध्यमातून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड गडचिरोलीतील युवकांना कौशल्य, आत्मविश्वास व रोजगाराच्या संधी प्रदान करत स्थानिक विकासाला नवी दिशा देत आहे.













