शहरातील मुख्य नाल्याच्या सफाईकडे पालिकेचे दुर्लक्ष
दमदार पावसापूर्वी सफाई करा; रंजनीकांत मोटघरे, नदीम नाथानी यांची मागणी
गडचिरोली: शहरातील अनेक वॉर्डातील सांडपाणी व पावसाचे पाणी गाव तलावात वाहून जाते. यासाठी पूर्वीपासून तलावात पाणी जाण्यासाठी मोठा नाला आहे. मात्र, या नाल्याची नियमीत सफाई होत नसल्याने पावसाळ्यात सदर वार्डांमध्ये मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ या नाल्याची सफाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे नदीम नाथानी, रजनीकांत मोघटरे यांनी केली आहे.
दरवर्षीच या नाल्यातील कचऱ्यामुळे पाणी तलावात जात नाही. याचा परिणाम कॅम्प एरियातील पोटेगाव बायपास मार्गावरील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसते. मुख्य रस्त्यावरही पाणी साचून राहते. यामुळे नालीतील दुषीत पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील काही वर्षांपासून कॅम्प एरिया, रेडड्डी गोडावून चौक, रामनगर, कन्नमवार वार्डातील पाण्याचे व्यवस्थापन योग्य रितीने केले जात नसल्याने या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तलावाच्या मुख्य नाल्याच्या सफाईकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावर्षी अजूनपर्यत दमदार पावसाने हजेरी लावली नाही. मुख्य तलाव असलेल्या गोकुलनगर परिसरात मागील बाजूने तलावात अतिरिक्त झालेल्या पाण्याला मार्ग देण्यात आला आहे. या परिसरातही मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागते. तलावात पाणी जाण्याचा व बाहेर निघण्याच्या मार्गाची सफाई नियमीत होणे अपेक्षित आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने दमदार पावसापूर्वी तलावात पाणी जाणाऱ्या नाल्याची सफाई करावी, अन्यथा काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नदीम नाथानी, रजनीकांत मोघटरे, रूपेश टिकले यांनी दिला आहे. (फोटो- 52)