‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नारी शक्ती दूत ॲपवर करता येणार अर्ज

65

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नारी शक्ती दूत ॲपवर करता येणार अर्ज

 

S Bharat news Gadchiroli  गडचिरोली दि. 2 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. जिल्ह्यातील महिलांनी 15 जुलै पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला टप्प्यात १ ते १५ जुलै या कालावधीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी पात्र महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर होतील. तसेच, ज्या महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप सुरू करण्यात आले आहे.

 

*योजनेचा उद्देश* : 1) महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, 2) त्यांचे आर्थिक – सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, 3) महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, 4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.

 

*लाभार्थी पात्रता* : 1) वय 21 ते 60 वर्षे असणारी महिला. 2) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. 3) विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

 

*अपात्रता* : 1) कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, 2) सरकारी नोकरी, 3) आजी/माजी आमदार/खासदार 4) कुटुंबाच्या मालकीची 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, 6) चार चाकी गाडी असणारे.

 

*अर्ज करण्याची पद्धत* : अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल. लाभार्थ्याला स्वत: ‘नारी शक्ती दूत’ हे ॲपवर अर्ज करता येईल.

 

*आवश्यक कागदपत्रे* : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

 

*अडचणी असल्यास येथे करा संपर्क* : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here