संविधान दिनानिमित्त लॉयड्स इन्फिनिटी फाऊंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर; १०१ युनिट्स रक्तसंकलन
गडचिरोली : संविधान दिनाचे औचित्य साधत नागरिकत्वाची जाणीव आणि मानवतेचा आदर्श उभा करत लॉयड्स इन्फिनिटी फाऊंडेशनतर्फे कोन्सरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लॉयड्स मेटल्सच्या परिसरात झालेल्या या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत एकूण १०१ रक्तदान युनिट्स संकलित करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालय (SDH) अहेरी येथील रक्तपेढीच्या पथकाच्या वैद्यकीय सहकार्यामुळे हे शिबिर अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडले. शिबिरात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) मधील वरिष्ठ अधिकारी तसेच लॉयड्स काली अम्मल हॉस्पिटलचे आरोग्य तज्ञही उपस्थित होते. कंपनीच्या समाजसेवेच्या बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे उपस्थितांनी मत व्यक्त केले.
या प्रसंगी लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरण यांनी कर्मचाऱ्यांना आणि स्वयंसेवकांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले,
“मानवता, समता आणि करुणा या आपल्या देशाच्या मुल्यांना आम्ही सलाम करतो. रक्तदान करून आपण केवळ जीव वाचवत नाही, तर जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्यही पार पाडतो.”
प्रभाकरण यांनी सर्व रक्तदात्यांचे व स्वयंसेवकांचे आभार मानत त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचे कौतुक केले.
आयोजकांनीही सर्व सहभागींचे आभार व्यक्त करत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान दिनानिमित्त घेतलेला हा उपक्रम समाजसेवेतून संविधानिक मूल्यांची उजळणी करणारा ठरला.













