बळजबरी भूसंपादना विरोधात जमीन हक्क परिषद शेतकरी कामगार पक्षातर्फे १८ मे रोजी भेंडाळा येथे आयोजन
चामोर्शी : जिल्ह्यात विविध प्रकल्पांसाठी लाखो एकर खासगी जमीनींचे भूसंपादन येणाऱ्या काळात करण्यात येणार आहे. आधीच राज्यातील सर्वात कमी शेतजमीनीचे क्षेत्र असलेल्याने सदरचे भूसंपादन बळजबरीने केले गेले तर जिल्ह्यातील शेतकरी उध्वस्त झाल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खासगी जमीनी वाचविण्याच्या दृष्टीने दिशा ठरविण्यासाठी १८ मे रोजी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जमीन हक्क परिषद भरविण्यात येणार आहे.जिल्ह्यात आधीच पाचवी अनुसूची आणि संविधानिक कायदे धाब्यावर बसवून लाखो एकरवर लोह खाणी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आणि आता प्रक्रीया उद्योगांसाठी शेतकऱ्यांच्या खासगी जमीनींच्या बळजबरी भूमिसंपादनाचा सपाटा लावला जाणार आहे. कोणतीही दिशा न ठरविता चमकोगिरी भूमिका घेतल्या गेली तर प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची मिलीजूली असल्याने कोणसरी प्रमाणे शेतकऱ्यांच्या हातातून जमिनी लाटल्या जाण्याची भिती आहे. योग्य दिशा ठरवून संघर्ष केला तरच शेतकऱ्यांच्या जमीनी वाचवता येतात. शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या पक्षांनी योग्य पध्दतीने भूसंपादन विरोधात लढे उभारून राज्यात सेझ सारखे प्रकल्प रद्द केल्याचा आणि रायगडात साडेबारा टक्के विकसीत जमीन मिळविल्याचा इतिहास असल्याने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या जमीन हक्क परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे, महामार्ग बाधित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिगंबर कांबळे, वकिल आघाडीचे प्रमुख भाई ॲड. देवेंद्र आव्हाड, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ.महेश कोपूलवार,जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, भाई शामसुंदर उराडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
योग्य मार्गाने आपल्या जमीनी वाचवू इच्छिणाऱ्या व भूसंपादन प्रक्रीयेत उचित न्यायाची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी या जमीन हक्क परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे भाई रमेश चौखुंडे, संजय दुधबळे, डाॅ. गुरूदास सेमस्कर, पवित्र दास, प्रभाकर गव्हारे, गोविंदा बाबनवाडे, दामोदर रोहणकर, राजू केळझरकर, मारोती आगरे, भैय्याजी कुनघाडकर, विजय राऊत व शेतकऱ्यांनी केले आहे.