‘डफरे बजाओ’ आंदोलनातून अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीची मागणी; अरविंदभाऊ कात्रटवार आक्रमक निकृष्ट पुल बांधकाम, बोगस कामे व भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शासनाला धारेवर

39

‘डफरे बजाओ’ आंदोलनातून अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या हकालपट्टीची मागणी; अरविंदभाऊ कात्रटवार आक्रमक
निकृष्ट पुल बांधकाम, बोगस कामे व भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून शासनाला धारेवर

 

गडचिरोली, दि. २५ मे २०२६ : सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच गडचिरोली जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी लोकनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ‘डफरे बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाद्वारे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधत अरविंदभाऊ कात्रटवार यांनी जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या निकृष्ट आणि नियमबाह्य कामांवर जोरदार टीका केली. “बोगस कामे करणाऱ्या आणि निकृष्ट पुल बांधकामातून भ्रष्टाचार करणाऱ्याला अभय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनादरम्यान “भ्रष्टाचारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, “हकालपट्टी झालीच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शेकडो समर्थकांसह अधीक्षक अभियंता यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली.
कात्रटवार यांनी आरोप केला की, कोरची तालुक्यातील नाडेकल–बेतकाठी मार्गावरील खोब्रागडी नदीवरील पुल वाहतूक सुरू होण्यापूर्वीच कोसळला. पुलाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०२५–२६ या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील रस्ते व पुल दुरुस्तीच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. कामे न करता बिले काढण्यात आल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
मागील तीन वर्षांत तब्बल पाच हजार कामांच्या निविदा नियमबाह्य पद्धतीने काढण्यात आल्याचा आरोप करत ही कामे मजूर सहकारी संस्थांना २० टक्के कमिशनवर विकण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
नाडेकल येथील कोसळलेल्या पुल प्रकरणाची उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करून शासकीय निधीची वसुली करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात आली. तसेच अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर कारवाई न झाल्यास नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला.
यावेळी यादवजी लोहंबरे, विनोद चापले, शाम झोडे, मोतीराम भुरसे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, दीपक लाडे, प्रशांत ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here