हेडरी येथे लॉईड्स व्हिलेज प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा शानदार समारोप

31

हेडरी येथे लॉईड्स व्हिलेज प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा शानदार समारोप

 

 

गडचिरोली, मे २०२६ : एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉईड्स स्पोर्ट्स ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या “लॉईड्स व्हिलेज प्रीमियर लीग (एलव्हीपीएल) २०२६” क्रिकेट स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात शानदार समारोप झाला. स्थानिक खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग, रोमांचक सामने आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद यामुळे ही स्पर्धा विशेष ठरली. एटापल्ली परिसरातील ग्रामीण भागातील क्रिकेट प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने क्रीडाभावना आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा ५ मे २०२६ रोजी पार पडला असून ७ मेपासून अधिकृत सामन्यांना सुरुवात झाली होती. १५ मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात बीसीसीसी आलदांडी संघाने तोडसा ट्रॉफी फायटर्स संघाचा अवघ्या ३ धावांनी पराभव करत एलव्हीपीएल २०२६ चषकावर नाव कोरले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा देताना B. Prabhakaran यांनी सांगितले की, “लॉईड्स स्पोर्ट्स अकॅडमी आणि संपूर्ण आयोजन समितीचे मी अभिनंदन करतो. स्थानिक युवकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सादर करण्यासाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.”
विजेत्या बीसीसीसी आलदांडी संघाला ७५ हजार रुपये रोख रक्कम आणि चषक प्रदान करण्यात आला, तर उपविजेत्या तोडसा ट्रॉफी फायटर्स संघाला ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. हेडरी हरिकेन्स संघाने तिसरे स्थान पटकावत ३० हजार रुपये जिंकले, तर नेंदर इलेव्हन हिरोज संघाला चौथ्या स्थानासाठी २० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांनाही प्रत्येकी १० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.
हेडरी हरिकेन्स संघाचा प्रसांजित सरकार याला उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी “मॅन ऑफ द सीरिज” पुरस्कार व १० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट युवा खेळाडू आणि सामनावीर अशा विविध वैयक्तिक पुरस्कारांसह प्रत्येकी ३ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, सीएसआर विभाग, लॉईड्स कंपनीचे विविध विभाग तसेच स्थानिक नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here