
५ फेब्रुवारीपासून गडचिरोलीत रंगणार लॉयड मेटल्स (जीपीएल) क्रिकेट स्पर्धा
गडचिरोली, ता. २ : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या वतीने बुधवार (ता. ५)पासून स्थानिक एमआयडीसी मैदानावर ‘लॉयड्स मेटल्स गडचिरोली प्रीमियर लीग’ (जीपीएल)क्रिकेट (लेदर बॉल) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे सर्व सामने दिवस-रात्र खेळवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तथा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांची विशेष उपस्थिती राहिल, अशी माहिती लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस. एस. खंडवावाला यांनी आज (ता. २)आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला लाॅयड्स मेटलचे निवासी संचालक सेवानिवृत्त कर्नल विक्रम मेहता, बलराम (भोलू) सोमनानी, रोहित तोंबर्लावार आदींची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेत पुढे माहिती देताना खंडलवाला म्हणाले की, उद्घाटन सोहळा बुधवारी दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. स्पर्धेसाठी एमआयडीसी मैदानावर भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत असून या स्पर्धेचे उद्घाटन भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या हस्ते व लॉयड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांना मुख्य पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा भव्य मार्च पास्ट होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमदेखील सादर केला जाणार आहेत, जो संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल. पहिला साखळी सामना संध्याकाळी ५ वाजता सुरु होईल, जिथे लॉयड्स संघ खेळणार आहे. दुसरा सामना रात्री ८:३० वाजता होईल. ६ फेब्रुवारीपासून पुढील सर्व सामने या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. हे दिवस-रात्र सामना फ्लड लाईट्सच्या प्रकाशात खेळवले जातील. गडचिरोली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एकूण १६ संघांचा समावेश राहणार असून १६ पैकी बारा संघ हे बारा तालुक्यांतील असतील. तसेच एक संघ लाॅयड्स मेटल कंपनीचा व इतर तीन संघ हे शासकीय विभागातून असणार आहेत. स्पर्धेचे प्रथम बक्षीस ११ लाख ११ हजार १११ रुपये राहणार आहे, द्वितीय बक्षीस ७ लाख, तृतीय बक्षीस ५ लाख व चौथे पारितोषिक २ लाख रुपये आहे. लीग मॅचमधील सामन्यात मॅन ऑफ द मॅच २५ हजार रुपये, क्वार्टर फायनल सामन्यात ५० हजार रुपये, सेमी फायनल सामन्यात ७५ हजार रुपये व फायनल सामन्याततील सामनावीराला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना लाखो रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रीमियर लीगमधील दहा ते १२ उत्कृष्ट खेळाडूंना राजस्थान रॉयल्स अकादमीत प्रशिक्षणाकरिता कंपनीतर्फे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा गडचिरोली जिल्ह्यातील गुणवंत व होतकरू क्रिकेट खेळाडूंकरिता सोनेरी भविष्याची संधी ठरणार आहे. या क्रिकेट स्पर्धेचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असून हिंदी व मराठीतील उत्कृष्ट असे समालोचक व उच्च दर्जाचे पंच आमंत्रित करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या लाॅयड्स मेटल्स अॅंड एनर्जी कंपनीच्या या भव्य क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन सोहळ्याला दहा हजारांहून अधिक क्रिकेटप्रेमींची उपस्थिती राहिल. ही स्पर्धा गडचिरोली जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरेल, असेही श्री. खंडवावाला पत्रकार परीषदेत म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात एवढी भव्य स्पर्धा आयौजित करण्यासारखे त्या दर्जाचे सुविधायुक्त मैदान नव्हते. मात्र कंपनीने एमआयडीसी मैदानात स्वखर्चाने उच्च दर्जाच्या तीन खेळपट्ट्या, क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा, प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था व सगळ्या आवश्यक सुविधा निर्माण केल्या आहेत. यानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात उत्तम दर्जाचे सर्वसुविधायुक्त क्रीडांगण तयार झाले आहे. स्पर्धेच्या ठिकाणी विविध खाद्य पदार्थ व इतर आवश्यक वस्तू, जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आदी साहित्य विक्री करण्यासाठी मोफत स्टाॅल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे अनेक गरजूंच्या व्यवसायाला चालना मिळेल.त्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकार परीषदेत करण्यात आले.