महामहिम राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्याने तरी गडचिरोली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार काय?भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांचा सवाल
गडचिरोली :- दि. 4 जुलै
गडचिरोली शहरातील प्रमुख चारही मार्गांवर व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे मात्र याकडे पोलीस विभागाने दुर्लक्ष केल्याने अजूनही शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागू शकले नाहीत. उद्या दिनांक 5 जुलै 2023 रोजी देशाचे महामहिम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुर्मु ह्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने तरी गडचिरोली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार काय असा सवाल भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी उपस्थित केला आहे.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल, अतिदुर्गम, जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त जिल्हा आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने आकांशीत जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. यातच जिल्हा नक्षलवादी कारवायाने ग्रस्त आहे या जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया नेहमीच होत असतात तसेच केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अन्य मंत्र्यांचे दौरे जिल्ह्यात नेहमीच होत असतात. त्यांच्या व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गडचिरोली शहरातील चारही प्रमुख मार्गांवर व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधी मंजूर झाले असल्याचे समजते, मात्र पोलीस विभागाने व जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अजूनही गडचिरोली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागू शकले नाहीत. उद्या दि. 5 जुलै रोजी महामहिम राष्ट्रपती यांचा जिल्हा दौरा असल्याने या निमित्ताने तरी गडचिरोली शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागणार काय ? असा सवाल भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी उपस्थित केला आहे.