गडचिरोली :- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रावर शिवसेनेने दावा केल्याने महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. आज आरमोरी विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी पत्रकार परिषद घेऊन या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.
गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात मागील दोन टर्म मध्ये भाजपचे खासदार निवडून आले आहेत. या मागील तीन निवडणुकीत एक वेळा काँग्रेस चे जेष्ठ नेते मारोतराव कोवासे हे निवडून आले होते. त्या नंतर काँग्रेसने उमेदवार नवा दिल्याने त्याचा पराभव झाला होता. त्या वेळ पासून इथे भाजपचे खासदार अशोक नेते सातत्याने दोनदा निवडून आले आहेत.
या वेळी प्रथमच शिवसेनेने गडचिरोली लोकसभा क्षेत्रात दावा केला आहे. यामुळे महाविकास आघाडी मध्ये आता चुरस वाढली आहे.
पत्रकार परिषदेत शिवसेनेचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, आरमोरीचे माजी सरपंच बुधाजी किरमे, माजी सदस्य श्रीमती तिजारे, गडचिरोली विधानसभा संघटक नंदू कुमरे, तालुका प्रमुख गजानन नैताम, उईके, धानोरा, आदी उपस्थित होते.