लॉयड मेटल ॲण्ड एनर्जीतर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी
आलदंडी येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
गडचिरोली(Gadchiroli) : लॉयड मेटल ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील आलदंडी येथे रविवार, ११ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिर पार पडले. या आरोग्य शिबिरात परिसरातील ९२४ नागरिकांची आरोग्य तपासणी करून गरजूंना औषधोपचार व संदर्भसेवा देण्यात आली. यासोबत यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आरोग्य शिबिरात बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ,अस्थिरोगतज्ज्ञ, सर्जन, मेडिसिन, ईएनटी, आदींचा ११ तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाला हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दडस, एटापल्लीचे संवर्ग विकास अधिकारी मोहर, आलदंडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी येनपे,
उडेराचे सरपंच गणेश गोटा, पोलीस पाटील महेश मट्टामी, भूमिया बिरसू मट्टामी, गावपाटील चैतू मट्टामी, आलदंडीचे माजी सरपंच चैतू मट्टामी आदी उपस्थित होते.
शिबिरामध्ये ९२४ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये अस्थिरोगासंदर्भातील १२० जणांची तपासणी केली. यापैकी १७ जणांना रेफर करण्यात आले. त्वचारोगाचे १०१, स्त्रीरोग ७१ जणांची तपासणी करून ६ रूग्णांना संदर्भसेवा देण्यात आली. ६७ बालकांची तपासणी करण्यात आली असून यापैकी चार बालकांना संदर्भित करण्यात आले आहे. शस्त्रक्रियेसंदर्भातील ४० जणांची तपासणी करून १४ जणांना संदर्भित करण्यात आले. कान, नाक, घसा रोगाच्या ४१ जणांची तपासणी करून सात जणांना संदर्भित करण्यात आले आहे. यासोबतच २५० जणांची नेत्रचिकित्सा करण्यात आली. ११०जणांना चष्मावाटप, ८ इसीजी, मलेरिया चाचणी २४, डेंग्यू चाचणी १२ व १६ जणांची टायफाईड तपासणी तसेच ४० जणांची रक्तशर्करा तपासणी करण्यात आली.
लॉयड मेटल ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. टी. स्वाती रेड्डी, शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र बोस नाईक, डॉ. रामक्रिष्ण गणपतीवार, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पी. नागराजू, अस्थीरोगतज्ज्ञ डॉ. साईचरण रेड्डी, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्रणय गांधी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनंत जाधव, एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गायत्री मारटकर, डॉ. जास्मीना टंेभूर्णे, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन इंगोले, ऑप्टोमेट्रिस्ट विवेक यांनी नागरिकांची तपासणी केली. तपासणी शिबिरामुळे स्थानिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.