गोंडवाना विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर

56

गोंडवाना विद्यापीठाचे सर्व निकाल जाहीर

 

गडचिरोली,(गो  gondwana univeraity Gadchiroli वि)दि:२३

गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी २०२२ सत्रात घेतलेल्या सर्व परीक्षांचे निकाल अपेक्षित वेळेपूर्वीच जाहीर झाले आहेत.

 

गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी २०२२ च्या एकूण ३०० परीक्षा दिनांक १० डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

 

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ८७, ८८ व ८९ नुसार परीक्षेच्या तारखेपासून जास्तीत जास्त ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे गरजेचे असते, मात्र विद्यापीठाने विक्रमी वेळेत म्हणजे केवळ २९ दिवसातच सर्व निकाल जाहीर केले असून निकाल जाहीर करण्याची सरासरी केवळ १६ दिवस इतकी आहे. कोविड मुळे देशभरातील विद्यापीठांचे वार्षिक नियोजन कोलमडले असताना अपेक्षित वेळेपूर्वी अचूक निकाल जाहीर होणे ही विद्यार्थ्यांसाठी आश्वासक बाब आहे.

 

अदिवासी भागातील राज्यातील एकमेव गोंडवाना विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक पातळीवर अतिशय आश्वासक काम करत आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सहयोगाने अध्ययन, अध्यापन, तसेच परीक्षा विषयक नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठातर्फे राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी मोबाईल ॲप, उन्हाळी २०२२सत्राच्या गुणपत्रिकेमध्ये क्यूआर कोडचा समावेश व त्याद्वारे कॅम्पस मुलाखतीत गुणपत्रिका पडताळणीची सुविधा इत्यादी उपक्रमांना विद्यार्थी तसेच महाविद्यालयांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 

सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याकरिता व वेळेत निकाल लावण्याकरिता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.डॉ. उत्तमचंद कांबळे, मुख्य मुल्यांकन अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यामुळे निकाल वेळेत घोषित झाले. तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याबाबत विद्यापीठाद्वारे आभार करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here