
गडचिरोली, दि..05/oct 23 अल्पवयीन मुलीवर भरदुपारी अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल कवडू म्हशाखेत्री (40) असे दोषी इसमाचे नाव असून, तो गडचिरोली तालुक्यातील दर्शनीमाल येथील रहिवासी आहे.

30 मे 2018 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पीडित मुलगी बाहेर लघुशंका करुन घराकडे जात असताना आरोपी अनिल म्हशाखेत्री याने तिला घराच्या धाब्यावर नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. यामुळे ती बेशुद्ध झाली असतानाही आरोपीने तिला एका शौचालयात डांबून ठेवले. रात्री साडेआठच्या सुमारास पीडित मुलीची ओढणी शौचालयाच्या दरवाजातून थोडी बाहेर निघाल्याचे दिसताच कुटुंबीयांनी तिला बाहेर काढले. त्यानंतर तिने कुटुंबीयांनी तिला आपबिती सांगितली.
तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल म्हशाखेत्री याच्यावर भादंवि कलम 363,376(2) (3) व 342, बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 4 व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करुन अटक केली. तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे व पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले
आज या प्रकरणाचा निकाल लागला. वैद्यकीय अहवाल, पीडितेचे बयाण आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश उत्तम मुधोळकर यांनी आरोपी अनिल म्हशाखेत्री यास २० वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेशही न्यायालयाने पारित केला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी बाजू मांडली.