मतदानाचे 80 टक्के उद्दीष्ट गाठण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करा – जिल्हाधिकारी संजय दैने

15

प्रशासन सज्ज : आता जबाबदारी मतदार राजाची

जिल्ह्यात 8 लाख 21 हजार 455 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मतदानाचे 80 टक्के उद्दीष्ट गाठण्यासाठी उत्स्फुर्तपणे मतदान करा – जिल्हाधिकारी संजय दैने

 

गडचिरोली दि. 19 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली आणि 69-अहेरी या तीन मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य निभावून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी पूर्ण करावी. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करतांना प्रशासनामार्फत किमान 80 टक्के मतदानाचे उद्दष्टि ठेवण्यात आले असले तरी सर्वांधिक मतदानाचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी मतदारांनी उत्स्फुर्तपणे जास्तीत जास्त संख्यने मतदानात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

 

*जिल्ह्यात 8 लाख 21 हजार 455 मतदार बजावणार मतदानाचा हक्क*

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 151 पुरूष, 4 लाख 9 हजार 294 महिला आणि 10 तृतीयपंथी असे एकूण 8 लाख 21 हजार 455 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 67-आरमोरी मतदारसंघात 1 लाख 31 हजार 60 पुरूष, 1 लाख 31 हजार 710 महिला व 1 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 62 हजार 771 मतदार, 68-गडचिरोली मतदारसंघात 1 लाख 54 हजार 610 पुरूष, 1 लाख 52 हजार 610 महिला व 3 तृतीयपंथी असे एकूण 3 लाख 7 हजार 223 मतदार आणि 69-अहेरी मतदारसंघात 1 लाख 26 हजार 481 पुरूष, 1 लाख 24 हजार 974 महिला व 6 तृतीयपंथी असे एकूण 2 लाख 51 हजार 461 मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात पुरूष व महिला मतदारांची संख्या जवळपास समसमान आहे.

*जिल्ह्यात 17 हजार 665 नवमतदार*

जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटात 9 हजार 915 पुरूष, 7 हजार 749 स्त्री व 1 तृतीयपंथी असे एकूण 17 हजार 665 नवमतदार आहेत.

 

*972 मतदान केंद्रासाठी 1166 बॅलेट युनिट व 1263 व्हीव्हीपॅट उपलब्ध*

जिल्ह्यात एकूण 972 मतदान केंद्र असून आरमोरी मतदारसंघात 310, गडचिरोली 362 व अहेरी येथे 300 मतदान केंद्र आहेत. या 972 मतदार केंद्रांकरिता 972 मतदान यंत्र वितरीत करण्यात आले आहेत. निवडणूक मतदान यंत्र वितरीत करतांना 20 टक्के कंट्रोल युनिट व 30 टक्के व्हीव्हीपॅट मशीन अतिरिक्त देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वितरीत करण्यात आलेल्या एकूण मतदान यंत्रामध्ये एकूण 1166 बॅलेट युनिट, 1166 कंट्रोल युनिट व 1263 व्हीव्हीपॅट यंत्रांचा समावेश आहे.

*मतदानाची वेळ*

आरमोरी, गडचिरोली, अहेरी या विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत आहे.

 

*जिल्ह्यात 29 उमेदवारांमध्ये लढत : आरमोरी-8, गडचिरोली-9 आणि अहेरीतून-12 उमेदवार रिंगणात*

*गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 असे एकूण 29 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.*

67-आरमोरी विधानसभा मतदार संघ: रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस, कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी, आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष, शिलू प्रविण गंटावार- अपक्ष, मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी, चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम), अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी,खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष.

68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ: मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस, डॉ. मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी, संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी, जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी, योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी, दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष, बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष, डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष

69- अहेरी विधानसभा मतदार संघ: आत्राम धरमरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी, संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी, आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष, कुमरम महेश जयराम- अपक्ष, गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष, नितीन कविश्वर पदा- अपक्ष, राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष, लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष, हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष

 

*विधानसभा निवडणुकीसाठी 1084 मतदान पथके*

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान घेण्यासाठी मतदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पथके संबंधीत मतदान केंद्रासाठी रवाना झाली आहेत. 972 मतदान केंद्रासाठी 972 मतदान पथकांसोबतच 112 पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. आरमोरी विधानसभा मतदार संघात 310 मतदान केंद्रासाठी राखीव पथकासह एकूण 346 मतदान पथके, गडचिरोली विधानसभा मतदार संघात 362 मतदान केंद्राकरिता 403 मतदान पथके आणि अहेरी विधानसभा मतदार संघाकरिता 300 मतदान केंद्रासाठी 335 मतदान पथके असे जिल्ह्यात एकूण 972 मतदान केंद्रासाठी 1084 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

*महिला, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्र*

मतदानाविषयी अधिकाधिक जनजागृती व्हावी व सर्व मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी तीनही मतदार संघात महिलांद्वारे संचालित प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र, दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे संचालित दिव्यांग मतदान केंद्र व युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचालित युवामतदान केंद्र तसेच आदर्श मतदान केंद्रही राहणार आहेत. अशी राहतील विशेष मतदान केंद्र

*६७-आरमोरी मतदारसंघ : ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ क्रं१३२ नगर परीषद मराठी प्राथमिक शाळा, खोली क्रमांक १ नैनपूर वार्ड, आरमोरी. दीव्यांग नियंत्र‍ित मतदान केंद्र क्रं१२५ हुतात्मा स्मारक कन्नमवार वार्ड देसाईगंज. युवा मतदान केंद्र क्रं.२२८ नगरपरिषद कार्यालय खोली क्रमांक १ आरमोरी. आदर्श मतदान केंद्र क्रं.११६, नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळा, नवीन इमारत पटेल वार्ड खोली क्रं.२, देसाईगंज (तुकुम वार्ड).

६८-गडचिरोली मतदार संघ : ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ क्रं ८८ पंचायत समिती कार्यालय, बचत भवन गडचिरोली. दीव्यांग नियंत्र‍ित मतदान केंद्र क्रं९२ खोली क्रमांक १, शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड, गडचिरोली. युवा मतदान केंद्र क्रं२२३ खोली क्रं४, जिल्हा परिषद शाळा, चामोर्शी. आदर्श मतदान केंद्र क्रं.११२, खोली क्रमांक१, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,

६९-अहेरी मतदार संघ : ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ क्रं१४१ नागेपल्ली. दीव्यांग नियंत्र‍ित मतदान केंद्र क्रंमाक १४६ अहेरी, युवा मतदान केंद्र क्रं.८४ हेडरी, आदर्श मतदान केंद्र क्रं.१७३ सिरोंचा.

 

*मतदानासाठी मतदारओळखपत्राशिवाय अन्य १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य*

मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्याव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यात आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाची दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

*पोलीस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज*

*16 हजार सुरक्षा जवान, 7 हेलिकॉप्टर, 130 ड्रोन, 5 ॲन्टीड्रोन गन, 750 कि.मी. रोड ओपनींग*

मावोवादग्रसत गडचिरोली जिल्ह्यात शांततेने निवडणूक प्रक्रीया पूर्ण पाडण्यासाठी गडचिरोली पोलिस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. जिल्ह्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल / राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या १११ कंपनी तसेच नागपूर शहर, महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक व पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर अशा विविध ठिकाणाहून एकुण ५०० पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक ७०० च्या वर गृहरक्षक दलाच्या जवानांसह एकुण १६ हजार च्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील ३६७ अतिसंवेदनशिल मतदान केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलेले असून सी-६० / सिआरपीएफ, क्यु.आर.टी पथकाच्या ३६ तुकड्यामार्फत जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आकाशमार्गाने देखिल सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधूनिक १३० ड्रोनसह सुसज्ज ड्रोन तसेच माओवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी ०५ अँटी ड्रोन गनदेखिल सज्ज राहतील. मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या मार्गावर डी.एस.एम.डी./ व्हेईकल माऊंटेड डी. एस. एम. डी चा उपयोग करुन सुमारे ७५० कि.मी. रोड ओपनिंग अभियान राबविण्यात येत आहे. यासोबतच भारतीय वायुसेनेचे ०३ भारतीय लष्कराचे २ ए. एल. एच असे एकुण ०५ हेलीकॉप्टर हे गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीला तैनातीस असून गडचिरोली पोलीस दलाच्या ०२ हेलीकॉप्टरसह एकुण ०७ हेलीकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोलीतील विविध संवेदनशिल व अतिसंवेदनशिल 211 मतदान केंद्रासाठी मतदान कर्मचाऱ्यांना मतदानयंत्र व इतर साहित्यासह पाठविण्यात आले आहे. कर्तव्यावरील पोलीसांमार्फत एकुण २९७९ टपाली मतदान करण्यात आले आहे. यासोबतच १७० आत्मसमर्पित माओवादी हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here