गोंडी शाळा सुरळीत चालण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांचे आश्वासन
धानोरा (गडचिरोली) : माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी दि. ०६ सप्टेंबर २०२४ रोजी “पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल’ या शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यासोबतच येथील गोंडी शिक्षक कर्मचारी व उपस्थित पालकांशीही चर्चा केली.
पारंपारिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल शाळा ही नामांकित गोंडी शाळा म्हणून शासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच आदिवासी समाजाला आपली गोंडी शाळा सुरळीत चालण्यासाठी शासनाने पुढाकार घेत शासन मान्यता देऊन आदिवासी समाजाला न्याय देण्याचा शासन स्तरावरून शुभ कार्य करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली. या मागणीवर आपण निश्चितच शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचा विश्वास डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी उपस्थितांना दिला.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम धानोरा तालुक्यातील पेंढरी जवळील मोहगाव येथे गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात आणि सीमेलगत असलेल्या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात गोंडी भाषा बोलली जाते. गोंडी ही पारंपारिक भाषा बोलणाऱ्यांची संख्या या जिल्ह्यात खूप जास्त आहे.
गोंडी भाषेतून शिक्षण देणारी संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील 244 (1), 350 (क) आणि 13 (3) (क) या कलमांमधील तरतुदीनुसार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये ही शाळा सुरू करण्यात आली आहे. आदिवासी समाजाची बोलीभाषा, संस्कृती, रूढी, प्रथा व परंपरा, आदिवासींची रचना ओळख हे वेगळी आहे. आदिवासी समाजाची मातृभाषा गोंडी आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने गोंडी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दृष्टिकोनातून ही शाळा सुरू करण्यात आली आहे.
यावेळी मोहगाव ग्रामसभा अध्यक्ष देवसाय आतला, जोगी उसेंडी, चैतु पावे, मनोज आतला, मनिराम आतला, काशिनाथ आतला, गोंडी लिपी शिक्षक शेषराव गावडे, उत्तम आतला, संजय गावडे, कोदू आतला, गांडो आतला आदी उपस्थित होते.