गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी
Sonali Gedam of Gadchiroli became the first beneficiary of Chief Minister’s Youth Work Training
विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी
10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन
S bharat news network गडचिरोली/नागपूर दि.25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
00000