प्रिंट मिडीयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

14

प्रिंट मिडीयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

• मतदानापुर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात

• 2 दिवस आधी अर्ज सादर करावा

 

गडचिरोली,दि.17 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम पूर्वप्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) स्थापन करण्यात आली. मतदानापुर्वीचा एक दिवस (19 नोव्हेंबर) आणि मतदानाच्या दिवशी (20 नोव्हेंबर) मुद्रीत माध्यमाद्वारे (प्रिंट मिडीया) प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. अशा जाहिरातींबाबतचे अर्ज, जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवसापूर्वी समितीकडे सादर करावे, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय दैने यांनी दिल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदार संघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट मिडीयातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभुल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहे.

कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य / जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणीत केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करू नये. मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यायची झाल्यास अर्जदारांना सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी समितीकडे अर्ज सादर करावा लागेल. भारत निवडणूक आयोगाच्या वरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here