जीडीपीएलच्या प्रेक्षकांसाठी मोफत बसेस, टी शर्ट आणि नाश्ताही
S bharat news network
गडचिरोली,ता.४: लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या (LMEL) वतीने येत्या ५ फेब्रुवारीपासून गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, क्रीडांगणावर पोहचण्यासाठी प्रेक्षकांना बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच वेळेपूर्वी पोहचणाऱ्या प्रेक्षकांना टी शर्ट आणि भरपेट नाश्ताही देण्यात येणार आहे.
गडचिरोली येथील एमआयडीसी (MIDC) मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ५ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. रवी शास्त्री यांना सन्मानित केल्यानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा मार्च पास्ट होणार आहे. यावेळी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.
दुपारी ३ वाजतापूर्वी आत येणाऱ्या प्रेक्षकांना टी शर्ट आणि नाश्ता देण्यात येणार आहे. शिवाय एमआयडीसी मैदानावर पोहचण्यासाठी गडचिरोली येथील राधे बिल्डींग समोरुन, बस डेपो, इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह,आयटीआय चौक, न्यायालय परिसर या ठिकाणांहून मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेटप्रेमींनी हा ऐतिहासीक सोहळा आणि सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बलराम उपाख्य भोलू सोमनानी यांनी केले आहे