गोंडवाना विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय पटलावर शैक्षणिक प्रयास पर्वाचा आरंभ
santoshbharatnews gadchiroli gondwana university गडचिरोली(गो वि)दि:१ गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि व्याटका स्टेट युनिव्हर्सिटी, किरोव, रशियन फेडरेशन यांच्यात सामंजस्य करार झाला होता. या सामंजस्य कराराला उच्च व तंत्रशिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन यांनी मान्यता प्रदान केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पटलावर गोंडवाना विद्यापीठाने पाऊल ठेवले आहे.
या करारा अंतर्गत शैक्षणिक सहयोग, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, संशोधन पदवी, संसाधनांची देवाणघेवाण, उन्हाळी कार्यक्रम, इंटर्न एक्सचेंज आणि शिष्यवृत्तीच्या संधी इत्यादी व्यापक पैलू आणि क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सामंजस्य कराराच्या तरतुदींतर्गत पहिल्या उपक्रमाचा भाग म्हणून, प्राथमिक स्तरावर देवाण-घेवाण तत्वाच्या आधारावर रशियन व इंग्रजी भाषेचा प्रत्येकी १०० तासांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम जानेवारी २०२३ पासून सूरू करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. व्याटका स्टेट विद्यापीठ रशियन भाषा शिकवेल तर गोंडवाना विद्यापीठ इंग्रजी भाषेतील समान अभ्यासक्रम त्यांना शिकविणार. सदर सामंजस्य करार समान देवाणघेवाण तत्वावर आधारित आहे.
या अनुषंगाने दिनांक ३१पासून व्याटका संघराज्य विश्वविद्यालय, किरोव्ह, रशिया यांचे १७ प्राध्यापक, अधिष्ठाता व संशोधक विद्यार्थी करीता इंग्रजी भाषा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या निमित्ताने गोंडवाना विद्यापीठा च्या प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय नागरिकांना थेट शिकविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
काल संपन्न झालेल्या पहिल्या परस्पर संवाद सत्रात सहभागी रशियन अभ्यागत यांनी इंग्रजी भाषेतील आकलन क्षमता, संवाद कौशल्य व अनुच्छेद लेखन इत्यादी बाबत उत्कंठा व्यक्त केली.
सदर करार अंतर्गत परिक्षेत्रातील तळागळ्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना रोजगारासह , आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळवून देणे असे प्रमुख उदिष्ट गोंडवाना विद्यापीठाने निश्चित केले आहे.
सदर उपक्रमास गोंडवानाचे कुलगुरू, डॉ. प्रशांत बोकारे यांचे मार्गदर्शन व कुशल नेतृत्व लाभले असून त्यास कार्यान्वित करण्यासाठी प्रा .मनीष उत्तरवार, संचालक नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य यांनी अथक परिश्रम घेतले. याकरिता इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.विवेक जोशी व प्रमोद जावरे अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून योगदान करीत आहेत.