गडचिरोली पोलीसांनी केला चारचाकी वाहन व अवैध दारुसह एकुण 5,32,800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी इसम नामे महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर हा अवैध रित्या आपल्या 2 साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतूक करून पो. स्टे. गडचिरोली हद्दीतील मोहझरी गावात राहणारा इसम नामे शिवा ताडपल्लीवार यास पुरवठा करणार आहे, अशा मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि. राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले. त्यानंतर सदर पथक रात्री 23.30 दरम्यान गडचिरोली येथील सत्र न्यायालय समोरील चौकात सापळा रचून बसलेे असता, एक चारचाकी वाहन हे भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलीसांनी वाहन चालकाला हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा दिला. त्यानंतर वाहनाची जवळून तपासणी केली.
सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या 40 पेटी (बॉक्स) किंमत अंदाजे 3,32,800/- रु. (तीन लाख बत्तीस हजार आठशे) मिळून आल्याने सदर अवैध दारु सहित एक चारचाकी महिंद्र कंपनीचे झायलो वाहन क्र. एम. एच. 14 सी.एस. 4221 किंमत अंदाजे 2,00,000/- (दोन लाख) रु. असा एकुण 5,32,800/- (पाच लाख बत्तीस हजार आठशे) रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे इसम नामे 1) रंजीत अरुण सरपे, वय-25 वर्षे, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर, 02) चेतन देवेंद्र झाडे, वय-25 वर्षे, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर याचे विरुध्द कलम 65 (अ), 83, 98 (2) म.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सदर गुन्हयात पाहिजे असलेले दोन आरोपी नामे 1) महेश हेमके, रा. मुडझा, ता. ब्राम्हपुरी, जि. चंद्रपूर व 2) शिवा ताडपल्लीवार रा. मोहझरी ता. जि. गडचिरोली यांच्या शोध घेणे सुरु असून सदर गुन्ह्राचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/शिवप्रसाद करमे आणि चापोअं/माणिक निसार यांनी पार पाडली