मतदार नोंदणीसाठी घरोघरी जावून नागरिकांना प्रोत्साहीत करा – विभागीय आयुक्त
निवडणुक कामाचा आढावा
प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार नोंदणी होणे आवश्यक
गडचिरोली,(S bharat news network)दि.16: लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार नोंदणी होणे आवश्यक असून यासाठी घरोघरी जावून नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे आणि मतदार नोंदणीला गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.
निवडणूक आयोगाच्या १ जुलै या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील निवडणुक कामाचा आढावा घेतला.
श्रीमती बिदरी यांनी मतदार साक्षरता व मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रमातून जनजागृती करण्याचे व जिल्हा प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांनी आपसी समन्वयाने निवडणूक मतदार नोंदणीला गती आणावी, असे सांगितले. कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंदवायचा शिल्लक राहू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी विधानसभा निवडणुक कामाच्या प्रगतीबाबत माहिती सादर केली. कामाच्या प्रगतीबद्दल श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, श्रीमती मानसी, आदित्य जिवने, उपजिल्हा निवडणुक अधिकारी विवेक घोडके तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.