अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

19

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

मुंबई, (प्रतिनिधी  mumbai). 3 :- “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रीमंडळाचे मी मनापासून आभार मानतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्राची मागील अनेक दशकांची मागणी होती. ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. यासाठी अनेक दशके प्रयत्न करणाऱ्या सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्त महाराष्ट्रवासीयांचे, मराठीभाषकांचे, मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केले असून यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here