कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्हयातील ९ आरोग्य संस्थाना पुरस्कार

25

कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्हयातील ९ आरोग्य संस्थाना पुरस्कार

गडचिरोली ०१: कायाकल्प योजनेअंतर्गत जिल्हयात एकूण ९ आरोग्य संस्थाना राज्यस्तरावरुन पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. यात रु.५० हजार ते ३ लाखापर्यंत असे एकूण 10 लाख रुपयांचे पुरस्कार जिल्ह्याला मिळाले आहे. कायाकल्प कार्यक्रमातुन आरोग्य केंद्राचे बळकटीकरण व सेवांचा दर्जा वाढविण्यावर भर देण्यात येत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले.

केंद्र शासनाने शासकिय रुग्णालयातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण व वैद्यकिय सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी सन २०१५ पासुन कायाकल्प पुरस्कार योजना सुरु केली आहे. जिल्ह्यामध्ये सर्व आरोग्य संस्थामध्ये कायाकल्प योजना राबविण्यात येत असून शासनाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील गुणवत्ता आणि सोयी सुविधा, उत्कृष्ट सेवा, बाहय परिसर स्वच्छता, निर्जतुकीकरण, बेड स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, बायोमेडीकल घन व द्रवरुप कचऱ्याची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पाणी बचत, सांडपाण्याचा निचरा आदी प्रत्येक बाबींसाठी गुण निश्चित करुन आरोग्य संस्थाना कायाकल्प योजनेअंतर्गत पारितोषीक करीता पात्र ठरविण्यात आलेले आहेत.

जिल्हयामध्ये प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडाताला पुरस्कार रक्कम रुपये २ लक्ष, प्राथमिक आरोगय केंद्र, मालेवाडा, पेरमिली, आलापल्ली व बोदली यांना प्रत्येकी रुपये ५० हजारांचे प्रोत्साहनपर पारितोषिक तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांना रु.३ लाख, उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी, ग्रामीण रुग्णालय -चामोर्शी व वडसा यांना प्रत्येकी रु.१ लाख प्रोत्साहनपर पारितोषीक देण्यात येत आहे. एकूण पुरस्काराची रक्कम रुपये १० लक्ष असून या रक्कमेतून आरोग्य संस्थाच्या सोयी सूविधामध्ये आणखी भर टाकण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले. तसेच प्रा.आ. केंद्र टेकडाताला ला प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्यल डॉ सचिन मडावी व डॉ धीरज खोब्रागडे यांचे अभिनंदन करण्यात आले.

या योजनेअंतर्गत आरोग्य संस्थाचे मुल्याकन बेस लाईन असेसमेंट, इंटरनल असेसमेंट, पिअर असेसमेंट, इक्सटरनल असेसमेंट या चार टप्यामध्ये परिक्षण, मुलाखत, रेकॉर्ड आढावा, प्रत्यक्ष रुग्णांची मुलाखत यावरून करण्यात येते.

आरोग्य संस्था प्रमुख व तेथील कार्यरत कर्मचारी वर्ग यांचे मुल्याकन झाल्यानंतर त्या संस्थेची टक्केवारी ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशा आरोग्य संस्थाचे पिअर मुल्यांकन केले जाते व पिअर मुल्याकनामध्ये ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असलेल्या आरोग्य संस्थेचे राज्यस्तरीय मुल्याकन केल्या जाते. अशा जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थांना प्रथम व प्रोत्साहनपर रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कायाकल्प योजना राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधूरी किलनाके तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here