गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज , साहित्य वाटप व मतमोजणी प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

26

गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज , साहित्य वाटप व मतमोजणी प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

गडचिरोली दि.१७ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या ६८- गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रिया संबंधी कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात पार पडले. याच ठिकाणी रविवारला सकाळी १० वाजता निवडणूक संबंधी साहित्य वाटप व साहित्य संकलन करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांचेही प्रशिक्षण पार पडले.

६८-गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा व चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश आहे.गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३६२ मतदान केंद्रासाठी ३६२ मतदान पथके नेमलेले आहेत. या व्यतिरिक्त ४१ पथके राखीव आहेत. निवडणूक पार पाडण्यासाठी विविध पथके नेमलेले आहेत.सकाळच्या प्रशिक्षणात मतदान पथकांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह इतर आवश्यक साहित्य मतदान केंद्रनिहाय वाटप करताना व संकलित करताना संबंधित पथकातील कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या कामाची जाणीव करून देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.

मतमोजणी शनिवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पासून येथील चंद्रपूर मार्गावरील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू होणार आहे. प्रथम टपाली मतपत्रिकेतील मतमोजणी १० टेबलवर होणार आहे.त्यानंतर ईव्हीएम वरील मतमोजणी १४ टेबलवर सुरू होईल. यासाठी मतमोजणी पर्यवेक्षक , सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक व रो-ऑफिसरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतमोजणी संबंधीच्या कामाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (चामोर्शी ) अमित रंजन , गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर, धानोराचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड,चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे , नायब तहसीलदार अमोल गव्हारे, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, नायब तहसीलदार चंदू प्रधान, नायब तहसीलदार डी. ए. ठाकरे उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here