आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य 2022 चे थाटात उद्घाटन
झाडीपट्टी रंगभूमी विविध कलागुणांनी समृद्ध आहे; अनिरुद्ध वनकर
गडचिरोली,()दि:११:-प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञानासोबत कलेचे उपासक असले पाहिजे त्यांच्यात ध्येय असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार आहेत. गाणं ,मूक अभिनय रांगोळी, नकला हे त्यांना जमतं पण त्यात ध्येय असणे आवश्यक असतं. धर्म, जात, पंत या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर असले पाहिजे. कलाकार व्यसनाधीन नसेल तर तो उत्तम प्रगती साधू शकतो. शिक्षण आणि प्रशिक्षण कलेला चीरतरूण ठेवतात. झाडीपट्टी रंगभूमी विविध कलागुणांनी समृद्ध आहे .झाडीपट्टीतल्या कलावंतांना प्रशिक्षण दिले तर ते मोठ्या स्तरावर जाऊ शकतात असा आशावाद सुप्रसिद्ध गायक नाटककार , प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांनी व्यक्त केला.
आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०२२ चे उद्घाटन सुमानंद सभागृह, आरमोरी रोड,गडचिरोली येथे पार पडले.या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे ,प्रमुख अतिथी म्हणून प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन ,संचालक(प्र.) विद्यार्थी विकास डॉ. शैलैंद्र देव आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी अनिरुद्ध वनकर यांनी वादळ वारा आणि माय ही दोन गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, कलेवर सुद्धा आपण जगू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अनिरुद्ध वनकर आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये जो धीर लागतो, जो घाम गाळावा लागतो ,जे कष्ट घ्यावे लागतात, ते आपण घेतले पाहिजे .आजच्या इंद्रधनुष्य कार्यक्रम मधून जे विद्यार्थी राज्यस्तरावर जातील, त्यांच्यासाठी योग्य त्या प्रशिक्षकाची व्यवस्था करण्यात येईल आणि त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिल्या जाईल त्यानंतरच ते राज्यस्तरावर पाठवण्यात येतील .चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी या विद्यापीठाचा कणा आहे.येथील विद्यार्थी हिरे आहेत आणि त्यांना पैलू पाडण्याचे काम विद्यापीठ करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शैलेंद्र देव यांनी,संचालन डॉ. शिल्पा आठवले तर आभार डॉ. रूपाली अलोणे यांनी मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यी आणि प्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.